‘त्यांच्या’ सामर्थ्य-संघर्षाला लाभले जिद्दीचे बळ
By Admin | Updated: December 18, 2015 00:59 IST2015-12-18T00:59:45+5:302015-12-18T00:59:45+5:30
संघर्षाला उत्कर्षाचे बळ दिल्यास कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. असाच प्रत्यय अंधांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध स्पर्धेतून जाणवत आहे.

‘त्यांच्या’ सामर्थ्य-संघर्षाला लाभले जिद्दीचे बळ
शैक्षणिक सप्ताहात विविध स्पर्धा : राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे आयोजन
भंडारा : संघर्षाला उत्कर्षाचे बळ दिल्यास कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. असाच प्रत्यय अंधांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध स्पर्धेतून जाणवत आहे. डोळ्यात जीवंतपणा नसतानाही आंतरीक शक्तीच्या सहायाने व जाणीवेच्या स्पर्शाने अपंगत्वावर मात करण्याचा त्यांच्या सामर्थ्याला जिद्दीचे बळ लाभले आहे.
गुरूवारी सकाळच्या सत्रात गायन आणि वादन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कोल्हापूर येथील शाळेची निवासी योगिता बोरगावे हिने गायनाला प्रारंभ करताच उपस्थित त्याचे मित्र मंडळी, परीक्षक व आयोजक काही वेळासाठी स्तब्ध झाले. डोळ्यात दृष्टी नसली तरी मनातील आंतरिक प्रेरणेणे सुरांमध्ये जीवंतपणा घालून तिने उपस्थितांचे मन एकत्रित करून घेतले. या स्पर्धेत विलास शिंदे (अहमदनगर), अक्षय नाईक (कोल्हापूर), आरती कांबळे (सांगली), उपासना वानखेडे (अमरावती), शोभा सावंत (आळंदी), संतोष सी. मेंढे (आमगाव), आदिनाथ इंगोले (लोहा-नांदेड), सुरेखा जाधव (आळंदी), कल्याणी आंबुले (गोरेगाव), हनुमंत गावंडे (अमरावती), अभिलाष पंडागळे (लोहा-नांदेड), चंद्रकांत वाघमारे (नांदेड), पवनी मुंडे (भोसरी-पुणे), पवन उके (अमरावती), दत्ता थिगळे (अहमदनगर), नवनाथ पाखरे (मिरज-सांगली), योगेश येवले (भोसरी-पुणे) यांनी सहभाग नोंदविला आहे. परिक्षक म्हणून संगीत विशारद राहूल हुमणे, दामिनी सिंग, पांडूरंग ठाकरे भूमिका बजावित आहे.
बुद्धीबळ स्पर्धेत आदिनाथ बघेले, विकास बाळणे, अमरदिप घटकर, सिताराम भिसे, पुजा चोरपगार, पवन दहातोेंडे, निकिता दुधाळ, सतीष एकनार, रितीकेश गायकवाड, मंजीरी मर्दाने, सचिन माटे, रवि मांजरे, भाष्कर पंढरे, सागर राऊत, चेतन सावंत, गोपाळ टापरे, जयश्री ठाकूर, संगिता कांबळे, भाग्यश्री बागळकर यांनी सहभाग नोंदविला आहे. परिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ पटू मिलिंद सावंत काम सांभाळीत आहे. ही मुले कौशल्याने बुद्धीबळ स्पर्धेत आपला कस पणाला लावत आहे. (प्रतिनिधी)
लुईस ब्रेल-अंधांचा देवदूत
अंध व्यक्ती म्हणजे सगितामधील त्याची प्रतिभा एवढीच ओळख असे सामान्यामध्ये समजले जाते. निकोलस सँडरसन एक गणितज्ञ व जॉन मॅटकॅफ रस्ते बांधणीकार हे दोघेही प्रसिद्ध व्यक्ती अंध होते. हे अनेकांना माहित नाही. डोळस व्यक्तीपेक्षा एक तज्ञ व्यक्ती म्हणून प्रसिद्ध प्रतिभाव व्यक्तीने फक्त सहा टिंबाचे आधारे अंध व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश दिला. त्या व्यक्तीने चमत्कारच घडविला. त्या महान व्यक्तीचे नाव आहे लुईस बे्रेल. लुईस ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी अत्यंत गरीब चर्मकार कुटुंबामध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस जवळील कुव्रे येथे झाला. लहानपणी वडिलांच्या साहित्याशी खेळत खेळता डोळ्याला दुखापत झाल्यामुळे तीन वर्षाच्या लुईला कायमचे अंधत्व आले. कुशाग्र बुद्धीच्या लुईला सामान्य मुलांच्या शाळेमधून शिक्षण देण्यात आले. १२ बिंदू आधारित लिपीचा सैन्यासाठी गुप्त संदेशासाठी उपयोग करीत असत. त्याचा अभ्यास करून लुईने त्या लिपीमध्ये सुधारणा करून फक्त सहा बिंदूच्या आधारे अंध व्यक्तींना पूर्ण उपयोगी पडणारी लिपीचा शोध लावला त्यामुळे त्या लिपीला ब्रेल लिपी संबोधण्यात येऊ लागले. दृष्टीहीनांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून प्रकाश देणाऱ्या देवदूताचा सहा जानेवारी १८५२ रोजी मृत्यू झाला.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रतर्फे आयोजित २८ व्या अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या जवळपास ३५० विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. काल बुधवारी सोहळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर आज गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहात ३५० विद्यार्थ्यांपैकी २५० मुले तर १०० मुली सहभागी झाले आहेत. आज गुरूवारी गायन आणि वादन, कथा कथन तर यातून उर्वरित असलेली स्पर्धा १८ डिसेंबरला होणार आहे. याचवेळी वकृत्व आणि काव्य वाचन स्पर्धा घेण्यात येईल. १९ रोजी डबल विकेट स्पर्धा, चैतन्य क्रीडांगणात पार पडणार आहे. त्याच दिवशी प्रश्नमंजुषा कार्यक्रम होईल.