आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST2021-03-29T04:21:50+5:302021-03-29T04:21:50+5:30
उन्हाळी चा हंगाम होणार प्रभावित पालांदूर : भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांचे ...

आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान पडूनच
उन्हाळी चा हंगाम होणार प्रभावित
पालांदूर : भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यापासून खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. ३१ मार्च धान खरेदीची शेवटची घटका आहे. परंतु पाच महिन्याचा कालावधी लोटूनही खरेदी केलेल्या धानाची भरडाई करीता उचल न झाल्याने धान खुल्या नभाखाली त्रिपाल च्या आधाराने पडून आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना तारणहार ठरलेला आहे.
शासनाच्या आधारभूत केंद्रावर शेतकरी हक्काने स्वतःच्या सातबाऱ्यावर धान विक्री करतो. यावर शासनाच्यावतीने मूळ किमती व्यतिरिक्त प्रोत्साहन राशी अर्थात बोनस सुद्धा देतो. त्यामुळे शेतकरी राजा आपला हंगाम आधारभूत केंद्रावर विकून मोकळा होतो. परंतु आधारभूत केंद्राने खरेदी केलेला धान पुढे भरडाई साठी उचल न झाल्याने धान संकटात सापडलेले आहेत. अवकाळी पावसाच्या दणक्यात धानाला सडका वास सुद्धा येत आहे. खरेदी केलेल्या धानाचा हिशेब शासनाला तंतोतंत पुरवण्याची जबाबदारी खरेदी केंद्रावर असते. यात खराब झालेल्या धानाचा नुकसान शासनाच्या वतीने तूट भरून मिळत नाही. त्यामुळे आधारभूत केंद्र शेतकऱ्यांचे आधार ठरलेले स्वतः मात्र निराधार होत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताकरिता खुल्या नभाखाली धान मोजणी करण्यात आले.
गोडाऊन उपलब्धता अत्यल्प असल्याने व शेतकऱ्यांचे धान मोजणे अत्यावश्यक झाल्याने खुल्या जागेत धान मोजल्या शिवाय पर्याय नव्हता. लोकप्रतिनिधींनी सुद्धा मोजणी करिता प्रोत्साहित केले. मात्र आता धानाची उचल होत नसल्याने मध्यस्थीची भूमिका लोकप्रतिनिधींनी निभवावी अशी अपेक्षा आधारभूत धान खरेदी केंद्राकडून व्यक्त होत आहे.
दि भगीरथ भात गिरणी मुरमाडी तुपकर अंतर्गत आधारभूत केंद्राच्या मध्यस्थीने ४५००० (पंचेचाळीस हजार) क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे. यातून भरडाई करिता केवळ २२००कट्टे ची उचल झालेली आहे. बाकी सर्व धान केंद्रात पडून आहे. उर्वरित धान झाकण याकरिता ७५०००₹ च्या त्रिपाल खरेदी करण्यात आलेले आहेत.
जिल्हा पणन कार्यालयाने आधारभूत खरेदी केंद्राच्या समस्यांची जाणीव ठेवून तात्काळ भरडा याचा प्रश्न निकाली काढावा.
मधुकर झंझाळ संचालक दी भगीरथ भात गिरणी मुरमाडी (तुपकर)
उताऱ्याची समस्या कायम!
धान भरडाई झाल्यानंतर मिलर्सनी शासनाला ६७ टक्के एवढे तांदूळ देणे आवश्यक आहे. परंतु हंगामाचा अभ्यास केला असता केवळ ६० टक्के एवढाच उतारा निघालेला आहे. त्यामुळे ७ टक्क्याची उताऱ्याची समस्या कायम आहे. या समस्या करिता लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयातील सचिव यांनी पुढाकार घेत शेतकर्यासह आधारभूत खरेदी केंद्रांना न्याय द्यावा. खरेदी केलेला धान १ मे पूर्वी न उचलल्यास उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची दाट शक्यता उभी झालेली आहे. गतवर्षी ला सुद्धा उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित झाला होता हे विशेष!