रेल्वेस्थानकावर सहा किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:52 IST2019-07-29T00:52:18+5:302019-07-29T00:52:59+5:30
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद करुन त्यांच्याजवळून सहा किलो गांजा जप्त केला, ही कारवाई भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली. जमशेद अब्दुल हमीब (४५) व मोहम्मद अली सत्तार अली (४०) अशी अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत.

रेल्वेस्थानकावर सहा किलो गांजा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद करुन त्यांच्याजवळून सहा किलो गांजा जप्त केला, ही कारवाई भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली.
जमशेद अब्दुल हमीब (४५) व मोहम्मद अली सत्तार अली (४०) अशी अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. नागपूर येथील मंडळ सुरक्षा आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या सूचनेवरुन भंडारा रोड रेल्वे सुरक्षा दलाने गोंडवाणा एक्सप्रेसमधील प्रवाशांवर पाळत ठेवली. पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरु होती. दरम्यान तिकीट निरीक्षकांना या दोघांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळ असलेल्या थैल्या लपविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावरुन त्या दोघांना पकडण्यात आले. त्यांना भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ असलेल्या थैल्यांची तपासणी केली असता प्लास्टिकचे बंद पॅकेट आढळून आले. त्यात सहा किलो गांजा आढळून आला. या दोघांजवळ रायपूर ते निझामूद्दीन प्रवासी तिकीट होते. सदर गांजा रायपूर येथून खरेदी केला असून दिल्ली येथे विकण्यासाठी नेत असल्याची कबूली त्यांनी दिली. वर्षभरातील ही दुसरी घटना असून गत वर्षी एका इसमाजवळून दहा किलो गांजा पकडण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक अनील पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विवेक मेश्राम, जयसिंग, अरविंद टेंभुर्णेकर, भुपेश देशमुख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.