८८ फुट उंच पाण्याच्या टाकीवर उभे राहून केले शोले स्टाईल आंदोलन; २५० गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:28 IST2026-01-28T15:27:22+5:302026-01-28T15:28:06+5:30
Bhandara : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रजासत्ताक दिनी पिपरी पुनर्वसन येथील ८८ फुट उंच पाण्याच्या टाकीवर उभे होत शोले स्टाईल आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

Sholay style protest by standing on 88 feet high water tank; Case registered against 250 Gosekhurd project victims
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रजासत्ताक दिनी पिपरी पुनर्वसन येथील ८८ फुट उंच पाण्याच्या टाकीवर उभे होत शोले स्टाईल आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
दरम्यान प्रकल्पग्रस्तांना महामार्गावरून हटविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. अखेर मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांचेशी सभा आयोजीत करण्याचे वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आश्वासन दिल्याने तणाव निवळला. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या पूर्ण करा, त्यानंतरच धरणाच्या पाण्यावर ८८ हजार कोटी रुपयांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि एक हजार कोटी रुपयांचा बहुउद्देशीय ज्ञान प्रकल्प करा. अन्यथा, प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा ईशारा प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, सदस्य अभिषेक लेंडे आणि दिलीप मडामेया यांनी १५ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान दिला होता. मात्र, २५ जानेवारी नंतरही उचित तोडगा न निघाल्याने, प्रकल्पग्रस्तांनीही टाकीखाली गोळा होत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
२५० जणांवर गुन्हा दाखल
रास्ता रोको आंदोलन व जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाऊ कातोरे यांच्यासह १०० ते २५० आंदोलक प्रकल्पग्रस्तांवर पोलिस हवालदार वसंत गजभिये यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार महेश कढव करीत आहे.
प्रकल्पग्रस्तांनी रोखला महामार्ग
भंडारा तहसीलदारांच्या संदेशाला धुळकावित काही प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन पत्र द्यावे, अशी मागणी करीत महामार्ग रोखला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिस प्रशासनाने वेळेचे भान ठेऊन सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.