पटशौकीन सुखावले : पुन्हा येणार गावाला यात्रेचे स्वरूपसंजय साठवणे ल्ल साकोलीशेतीचा हंगाम आटोपल्यानंतर झाडीपट्टीत शंकरपटाचे आयोजन होत असे. मात्र तीन वर्षापासुन शंकरपटावर बंदी आल्यामुळे पटशौकीनांमध्ये निरूत्साह होता. अखेर केंद्र सरकारने शंकरपटावरील बंदी उठविल्यामुळे पुन्हा शंकरपटाच्या दानीवर बैल धावणार आहेत. या निर्णयामुळे पटशौकीन सुखावले असुन बेरोजगारांना रोजगारही मिळणार आहे.साकोली तालुक्यातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी गाय, बैल, शेळी अशी जनावरे असायची. शंकरपट मागील तीन वर्षापुर्वी बंद झाल्यामुळे पटशौकीनांनी बैल विक्रीला काढले. आताकेंद्र सरकारने शंकरपटावरील बंदी उठविण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व पटशौकीनात आनंद संचारला आहे. शेतीचा हंगाम संपला की दिवाळीनंतर शेतकरी मनोरंजन म्हणून बैलचा शंकरपट भरवित होते. या शंकरपटाच्या माध्यमातून मुलामुलीची लग्न जोडणे, एकमेकांच्या गाठीभेटी व्हायच्या. एकमेकांचा संपर्क वाढत होता. याठिकाणी हॉटेल्स, आकाश पाळणे, नाटक, लावणी, तमाशा, आर्केस्ट्रा या माध्यमातून रोजगार मिळत असे. तीन वर्षांपूर्वी पटावरील बंदीमुळे हा सर्व प्रकार बंद झाला होता. आता पुन्हा शंकरपटानिमित्ताने गर्दी फुलणार आहे.बैलांचे शंकरपट हे केवळ मनोरंजनाचे साधन आहे. शेतकऱ्यांनी बैलाना हाकताना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. झालेला निर्णय योग्य व शेतकरी हिताचा आहे.- बाळा काशीवार, आमदार साकोली.केंद्र सरकारने शंकरपटातील बंदी उठविल्यामुळे पटशौकिनाना आंनद झाला असुन शंकरपट हा मनोरंजनाचे माध्यम आहे. शंकरपटावर कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी.- जगत रहांगडाले, पटप्रेमी.शंकरपटातील बंदी उठविण्यात यावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. शंकरपटामुळे अनेकांना रोजगार मिळतो. मुलामुलींचे लग्न जुळतात. शंकरपटामुळे संस्कृती जोपासली जाते. - प्रभाकर सपाटे, याचिकाकर्ता.शंकरपटावरील बंदीमुळे शेतकऱ्यात कमालीची नाराजी पसरली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी बैलाची विक्री केली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यामध्ये पुन्हा गोधनात वाढ होईल. - हेमकृष्ण वाडीभस्मे, साकोली.
शंकरपटाची दान गजबजणार
By admin | Updated: January 9, 2016 00:44 IST