गणराज्य दिनापूर्वी नियोजन समिती स्थापित करा
By Admin | Updated: January 9, 2016 01:04 IST2016-01-09T01:04:10+5:302016-01-09T01:04:10+5:30
जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची समिती असून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद सदस्यांना या समितीत स्थान दिले गेले नाही.

गणराज्य दिनापूर्वी नियोजन समिती स्थापित करा
सहा महिने लोटले : डहारे यांची मागणी
भंडारा : जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची समिती असून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद सदस्यांना या समितीत स्थान दिले गेले नाही. येत्या आठ दिवसात जिल्हा नियोजन समितीत नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांना स्थान देण्यात यावे अन्यथा या विरोधात २६ जानेवारीला जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेमार्फत विकासात्मक योजना कशा राबवायच्या असा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना या समितीत सामावून घेणे गरजेचे असताना जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांना सामावून घेतलेले नाही. हा जिल्हा परिषद सदस्यांवर एक प्रकारचा अन्याय आहे.
शासन प्रशासनाच्या लाल फितशाहीमुळे जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत स्थान मिळाले नसल्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या विकास कामांसाठी निधीची मागणी कशी करायची, असा प्रश्न सदस्यांसमोर उभा ठाकला आहे.
शासन प्रशासनाच्या उपेक्षित धोरणामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामे रखडले असल्याचा आरोपही डहारे यांनी केला आहे.
याबाबत शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना २६ जानेवारीपूर्वी समाविष्ट करण्यात यावे अन्यथा या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल.
याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, असा इशाराही नरेश डहारे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)