अंध-अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी
By Admin | Updated: December 17, 2015 00:39 IST2015-12-17T00:39:05+5:302015-12-17T00:39:05+5:30
सेवाभाव हा भाव नसून एक धर्म आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी यासाठी महाराष्ट्रातील संतांनी रक्ताचे पाणी केले.

अंध-अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी
भंडारा : सेवाभाव हा भाव नसून एक धर्म आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी यासाठी महाराष्ट्रातील संतांनी रक्ताचे पाणी केले. अहोरात्र जनजागृती केली. अंध अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी आहे व त्या दिशेने सर्वांनी पाऊले उचलली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन आ.बच्चू कडू यांनी केले. भंडारा येथील जलाराम मंगल कार्यालयात राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने २८ व्या अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आ.कडू बोलत होते.
राज्यातील दृष्टिहीन व्यक्ती एकत्रित येवून त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी व एक व्यक्ती म्हणून समाजकार्यात तसेच देशहितासाठी आगेकूच करावी, ही स्वयंपे्ररीत भावना लक्षात घेऊन भंडारा येथे अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळा दि.२० डिसेंबरपर्यंत आयोजित केला आहे.
याचे विधिवत उद्घाटन अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुमंत देशपांडे उपस्थित होते. अतिथी म्हणून आ.बच्चू कडू, सुप्रसिद्ध साहित्यीक हर्षल मेश्राम, बांधकाम व्यवसायीक सुनिल मेंढे, दृष्टिहीन संघाचे अध्यक्ष महादेव गुरव, उपाध्यक्ष राजू भगत, महासचिव वसंत हेगडे, रविकांत बारड, पांडूरंग ठाकरे, लायन्स क्लबचे निर्वाण, संध्याताई निर्वाण, मनीष थुल, शुभदाताई पटवर्धन, विठ्ठल देशपांडे, गौरीशंकर बावणे, हर्षल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.कडू म्हणाले शासनाच्या वतीनेही असा सप्ताह सोहळा क्वचितच अंधांसाठी आयोजित केला असावा. भंडारा जिल्ह्यात हा सोहळा माझ्या हाताने उद्घाटीत होत आहे ही खरच माझ्यासाठी सौभाग्याची गरज आहे.
मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार व गुरुद्वाराची उंची वाढविण्यापेक्षा अंध व अपंगांच्या घरांची उंची वाढली पाहिजे. त्यांच्यासाठी लढायला माणसं समोर आली तर अंध माणसातही देव दिसला असे समजा. राज्यात यापूर्वी अंध व अपंगांची नोंद करण्यात येत नव्हती. मात्र आंदोलनानंतर राज्य शासनाने अंध व अपंगांची नोंद करायला सुरुवात केली आहे. अंध व अपंगांसाठी होत असलेल्या कायद्याची २५ टक्केही अंमलबजावणी होत नाही. कायदा असूनही अंमलबजावणी होत नसेल तर न्याय कुणाकडे मागावा? अशी स्थिती सध्या शासनाने निर्माण करून ठेवली आहे. अंध अपंगांच्या वेदना आपल्याला कळायला हव्यात. येणाऱ्या काळात अंध व अपंगांच्या मागण्यांसाठी जीवाचे रान करू, असा ठणठणीत इशाराही आ.कडू यांनी दिला.
याप्रसंगी प्रा.डॉ.सुमंत देशपांडे, साहित्यिक हर्षल मेश्राम यांनीही अंध व अपंगांच्या समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन करून उपाययोजनेबाबत सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष महादेव गुरव यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पंडागळे यांनी तर आभार राजू भगत यांनी मानले. (प्रतिनिधी)