वरठीत सुरक्षेचा भार असुरक्षित पोलिसावर

By Admin | Updated: February 26, 2015 00:31 IST2015-02-26T00:31:37+5:302015-02-26T00:31:37+5:30

मोहाडी तालुक्यात वरठी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. वरठी येथे १९७२ ला भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरु करण्यात आली.

The security burden on the unprotected policeman | वरठीत सुरक्षेचा भार असुरक्षित पोलिसावर

वरठीत सुरक्षेचा भार असुरक्षित पोलिसावर

तथागत मेश्राम वरठी
मोहाडी तालुक्यात वरठी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. वरठी येथे १९७२ ला भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरु करण्यात आली. त्यावेळी १ पोलीस हवालदार व २ सहाय्यक हवालदाराची नियुक्ती करण्यात आली होती. ५० वर्षानंतरही कर्मचाऱ्याची संख्या तेवढीच आहे. दरम्यान या चौकी अंतर्गत येणाऱ्या गावाचे क्षेत्र व लोकसंख्येत दहापटीने वाढले. त्याबरोबर गुन्ह्यात वाढ झाली. गावात रेल्वे स्टेशन असल्यामुळे चोरी, लुटमार, गुन्हे, अवैध व्यवसाय, वाहतूक अव्यवस्था या सारख्या घटना वाढल्या. पण पोलीस चौकीत सुधारणा झाली नाही. सुरक्षेचा प्रश्न उद्वभवल्यास आजही भंडारा येथून येणाऱ्या कर्मचाऱ्याची वाट पहावी लागते. सुरक्षा कर्मचारी कमी असली तरी परिस्थिती हाताळणारी माणसे असल्यामुळे गावात अनुचीत घटना घडत नाही. पण चोरी, लुटपाट, अवैध व्यवसाय व वाहतूक यासारख्या घटना घडतातच.
१२ गाव, तीन कर्मचारी : वरठी चौकी अंतर्गत १२ गावे येतात. यात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील गावांचा समावेश असून लगतच्या नागपूर व गोंदिया जिल्ह्याच्या सिमा पर्यंतचा भाग या चौकी अंतर्गत येतात. मोहाडी तालुक्यातील वरठी सह, एकलारी, बीड, सातोना, पाहुणा, नेरी, खमारी व भंडारा तालुक्यातील सोनुली, सिरसी, जमनी - दाभा, व पाढंराबोडी या गावाचा समावेश आहे. वरठी चौकीच्या अंतर्गत येणाऱ्या दोन टोकाच्या गावातील अंतर ३४ किमी आहे.
भाड्याच्या घरात : १९७२ पासून सदर पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. बाजारातील एका इमारतीत ही चौकी आहे. तिन खोल्याच्या या घरात असुविधांचा बोलबाला असून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. सदर घर असुरक्षीत असून वेळप्रंसगी आरोपी ठेवण्यालायक जागा उपलब्ध नाही. समोरच्या खोलीत कार्यालयाची व्यवस्था आहे. दोन नंबरच्या खोलीत आराम करण्यासाठी पंलग व दस्तावेज ठेवले आहेत. तिसऱ्या खोलीत स्वंयपाकघर असून रात्रपाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी वापर होतो.
वाहन व्यवस्था नाही : वरठी पोलीस चौकी अंतर्गत ३४ किमीचे अंतराचे कार्यक्षेत्र आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चौकीत एकही चार चाकी वाहन नाही. पोलीस स्टेशनचे फोन खणखणाताच येथे कार्यरत कर्मचारी स्वत:च्या दुचाकीने पळत सुटतात. एखादी मोठी घटना घडल्यास किंवा दंगा झाल्यास त्यावर अंकुश लावण्यासाठी किंवा घटनास्थळावर जाण्यासाठी त्यांना भंडारा येथून येणाऱ्या वाहनाची प्रतिक्षा करावी लागते.
पोलिस कर्मचारी नाममात्र
येथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह तीन हवालदार अस्थायी नियुक्त आहेत. यापैकी एक कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असल्यास तिनच कर्मचारी राहतात. १२ गावाची सुरक्षा व त्यासाठी असलेली व्यवस्था तोकडी आहे. त्यातल्या त्यात येथील कर्मचारी भंडारा येथे ड्युटी लावण्यात येते. कोणताही गुन्हा घडला की भंडारा येथे नोंद करण्यासाठी जावे लागते, म्हणून बहुतेक वेळा चौकी कुलुपबंद राहते.
गस्तीची गरज
गावात रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवस - रात्र प्रवाशांची रेलचेल राहते. रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था नाही. सदर परिसर यांच्या हद्दीत येते. रेल्वे स्टेशन असल्यामुळे गावात चोरांना सोयीचे होते. यामुळे येथे नियमित गस्त वाढवण्याची गरज आहे. याकरिता पोलिस वाहन व अतिरिक्त कर्मचारीची आवश्यकता आहे.
असुरक्षित पोलीस : सध्याच्या युगात चोर - डाकू अद्यावत शस्त्र बाळगत असताना लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस निशस्त्र फिरतात. हातात काठी घेवून शस्त्रधारी गुंडाना किंवा गर्दीला कसे पांगवायचे असा प्रश्न त्यांना पडतो. यामुळे अनेकदा त्यांना पळ काढावा लागतो. एंकदरीत वरठी येथे नियुक्त पोलीस कर्मचारी असुरक्षित आहेत.
पोलीस ठाण्याचा प्रस्ताव गायब
स्व. आर. आर. पाटील यांनी ५ वर्षापुर्वी वरठी येथे पोलीस ठाणे मंजुर केला होता. दरम्यान अनेकदा मागणी झाली. पण सदर प्रस्ताव व मंजुरी गायब झाल्यासारखे दिसते.
लोकसहभागावर भर
पोलीस कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या व गैरसमज यातून निर्माण होणारे क्षुल्लक वाद यावर लोकसहभागातून तोडगा काढण्याचा स्तुत्य उपक्रम या चौकीत सुरु आहे. गुन्ह्याची वास्तवता शोधून त्यातील गंभीरता पाहून गुन्ह्याची नोंद होते. आपसी विवाह व गैरसमज दुर करण्याकरिता गावातील पंचाचा आधार घेतला जातो. गावातील गुन्हे गावातच सोडवण्यात यावे, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. लोकसहभागातून वाद मिटवण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे.

Web Title: The security burden on the unprotected policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.