१० पोलिसांवर ५१ हजार लोकांची सुरक्षा
By Admin | Updated: December 16, 2015 00:44 IST2015-12-16T00:44:38+5:302015-12-16T00:44:38+5:30
सिहोरा पोलीस ठाण्याच्या मंजुरीला अनेक वर्षे लोटली ; परंतु अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.

१० पोलिसांवर ५१ हजार लोकांची सुरक्षा
पोलिसांचे पदे रिक्त : बपेरा पोलीस चौकीची मंजुरी रखडली, बिट अमलदारांना अतिरिक्त प्रभार
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा पोलीस ठाण्याच्या मंजुरीला अनेक वर्षे लोटली ; परंतु अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. रिक्त पदांमुळे १० पोलिसांवर ५१ हजार नागरिकांची सुरक्षा करण्याची वेळ आली असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे.
आंतरराज्यीय सिमेवर असलेल्या सिहोरा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची कैफियत वेदनादायक आहे. या ठाण्याच्या पूर्व आणि दक्षीणेला हाकेच्या अंतरावर नक्षलग्रस्त बालाघाट आणि गोंदिया जिल्हयाच्या सिमा लागून आहेत. या शिवाय सिहोरा परिसरात वाढती गुन्हेगारी असतांना शासन स्तरावर देण्यात येणाऱ्या सुविधा मात्र बोटावर मोजण्याइतपत आहेत. पुरग्रस्त गावे, जंगलव्याप्त परिसर तथा भौगोलिक दृष्ट्या विस्तारलेला परिसर लक्षात घेता पोलीस ठाण्यात सुविधा उपलब्ध करण्याची ओरड आहे. या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व पोलीस तथा कर्मचारी असे एकुण ५५ पदे आहेत. परंतु हा आकडा आजवर कधी पुर्ण झालेला नाही.
रिक्त पदे तथा प्रभारावर गावांची जबाबदारी असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था दिसून येते. पोलीस ठाण्यात सद्यस्थितीत पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व २७ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दर दिवशी १२-१५ पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. उर्वरित पोलीस ठिकाणी बंदोबस्त, समन्स वाटप, रजा आरोपीची शोध मोहिम तथा न्यायालयात हजेरी लावत आहेत. यामुळे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. एखादी मोठी घटना घडल्यास कर्मचारी बोलविण्यात येत आहेत. या पोलीस ठाण्यात महिला पोलिसांची समस्या आहे. ५ महिला पोलिसांची गरज असतांना फक्त २ कार्यरत आहेत. या पैकी १ महिला पोलीस रजेवर असल्याने कर्तव्य बजावतांना एका महिला पोलिसाला कसरत करावी लागत आहे. वायरलेस मध्ये काम दिल्यास महिला आरोपींना अटक करतांना डोकेदुखी ठरत आहे. दोष पोलीस कर्र्मचाऱ्यांना नाही. रिक्त पदे असल्याने अतिरिक्त तणावात कर्तव्य बजाविण्याची वेळ आली आहे. बपेरा, महालगाव, मोहगाव (खदान), चादंपुर आणि सिहोरा असे एकुण ५ बिट या पोलीस ठाणे अंतर्गत आहेत. एका बिट अमलदाराकडे दोन बिट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिरिक्त गावांचा प्रभार देण्यात आल्याने दमछाक सुरु झाली आहे. २८ पदे अद्यापही रिक्त आहेत. याशिवाय पोलीस ठाण्यात प्रस्तावित महिला बंदीगृह आहे. पंरतु अद्याप बांधकाम झाले नाही.
पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला प्रसादन गृहाची सोय करण्यात आली नाही. यामुळे महिलांची कुंचबना होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागा उपलब्ध असतांना वसाहत बांधकाम झाले नाही. प्रशासकीय कामकाज करतांना इमारतीत खोल्यांचा अभाव आहे. यामुळे गोंधळाची स्थिती आहे. स्वतंत्र नविन इमारत मंजुर करण्याची ओरड आहे. परंतु जिल्हा प्रशासन गांभीर्याने घेत नाही. मध्यंतरी पोलीस ठाण्याला हायटेक करण्याची चर्चा होती. नंतर मात्र ही चर्चा हवेतच विरली. सुविधा आणि रिक्त पदामुळे नागरिकांना न्याय देण्यात विलंब होत आहे. यामुळे असंतोषाचे खापर पोलीस प्रशासनावर फोडले जात आहेत. या असंतोषाचा फटका ठाणेदार व पोलिसांना बसला आहे. प्रशासकीय कामकाज तथा फिर्यादींना जलदगतीने न्याय देण्यासाठी पोलिसांची रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया पोलिसांनी दिल्या आहेत. या सदंर्भात अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही. (वार्ताहर)