भंडाऱ्यात ‘एम्स’साठी जमिनीचा शोध
By Admin | Updated: September 18, 2014 23:30 IST2014-09-18T23:30:21+5:302014-09-18T23:30:21+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) साठी विदर्भात प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भंडारा जिल्ह्यात जागेचा शोध सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील अशोक

भंडाऱ्यात ‘एम्स’साठी जमिनीचा शोध
अशोक लेलॅण्डची जागा रिकामी : नाना पटोलेंनी दिला प्रस्ताव
भंडारा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) साठी विदर्भात प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भंडारा जिल्ह्यात जागेचा शोध सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील अशोक लेलॅण्ड कारखाना परिसरातील २०० एकर रिकामी जागा मागण्यात आली आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास प्रस्तावित एम्स रुग्णालय भंडारा येथे साकार होऊ शकतो, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली.
छावा संग्राम परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, प्रस्तावित आयुर्विज्ञान संस्थेसाठी २०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी नागपूर येथे जामठा परिसरात जमिनीचा शोध सुरू आहे. परंतु तिथे ११० एकर पेक्षा अधिक जमिन नाही. त्यामुळे महामार्गावर भंडारा जिल्ह्यात जमिन शोधण्याचे काम सुरू आहे.
अशोक लेलॅण्ड कारखान्याला २४० एकर जमिन देण्यात आली होती. परंतु या कारखान्याचे काम केवळ २५ एकरात सुरू आहे. त्यामुळे २१५ एकर जमिन रिकामी पडून आहे. त्यामुळे अशोक लेलॅण्ड व्यवस्थापनाला ही संपूर्ण जमीन उपयोगात आणा नाही तर रिकामी २१५ एकर जमिन परत करा, जेनेकरुन ‘एम्स’साठी या जमिनीचा उपयोग होऊ शकेल, यासंबंधीचे पत्र पाठविल्याचे पटोले यांनी सांगितले. भंडारा जिल्हा महामार्गावर असून नागपूरचे अंतर तासाभराचे आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘एम्स’ होण्यासाठी हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
गोंदिया होणार मध्यवर्ती जंक्शन
भंडारा-गोंदिया क्षेत्रासाठी गोंदिया -जबलपूर रेल्वेमार्ग विस्तारी करणासाठी तरतूद आहे. दक्षिणेकडून धावणाऱ्या रेल्वे इटारसीशिवाय गोंदियाकडून जातील. भविष्यात गोंदिया रेलवेस्थानक मध्यभारतातील मोठे जंक्शन म्हणून उदयास येईल. गोंदियाला नागपूर-जबलपूर मार्गाने जोडून राष्ट्रीय महामार्गासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. यात गोंदियाला मध्यप्रदेशाशी जोडण्याची योजना आखण्यात आली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय दुग्ध प्रकल्प कुठेही नाही. विदर्भात या प्रकल्पाची स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भंडारा जिल्हा विभाजनाच्या १५ वर्षांनंतरही नवोदय विद्यालय नाही, याकडे सरकारचे ध्यानाकर्षण केले आहे.
भंडारा रेल्वे स्थानकाला दर्जेदार बनविण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून स्थानकाच्या सौंदर्यीकरणासह प्रवाशांसाठी सुविधा देण्याची मागणी केली आहे.
पत्रपरिषदेला जिल्हा उपाध्यक्ष श्याम पांडे, मुकेश थानथराटे, भरत खंडाईत, प्रदीप पडोळे, रामकुमार गजभिये, नितीन कढव, विकास मदनकर, लोकेश रंगारी, आरीफ पटेल उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)