ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रशासन गुंतल्याने रेती तस्करांनी संधीचे सोने करण्यासाठी कंबर कसली आहे. भोजापूर रेती घाटावर रात्रभर ट्रॅक्टरने उपसा करून नदीकाठावरील पाण्याच्या जलकुंभाजवळ रेतीची डम्पिंग केली जात आहे. गेल्या आठवड्यापासून रात्रीला या घाटावर वाहनांची रेलचेल आहे. रात्री उपसा केलेली रेती पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान नागपूर, अमरावती, वर्ध्याकडे लांबविली जाते. मात्र महसूल प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे. पवनी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून महसूलशी आर्थिक साटे-लोटे करून रेती तस्कर उपसा करीत आहेत.
भोजापूर रेती घाटावर रात्रभर ट्रॅक्टर, टिप्परची वर्दळ वाढली आहे. उपसा केलेली रेती पात्राबाहेरील पंचनामा केलेल्या ढिगाऱ्यावर टाकून तस्करी केली जाते.
हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. नदीपात्रातून मध्यरात्री रेतीचा उपसा केला जात असल्याने या मागे कोणाकोणाचे लागेबांधे आहेत, याची चर्चा सध्या भोजपूर परिसरात सुरू आहे. कोणाच्या तरी राजकीय वरदहस्ताशिवाय हे काम होणार नाही हेही सर्वांना ज्ञात आहे, परंतु सध्या हा व्यवसाय जोरात सुरू आहे.