लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना रेतीचा बेसुमार उपसा सुरु असून थेट नदीपात्रातून वाहतूक सुलभ व्हावी यासाठी तस्कर नदीची नैसर्गिक संरक्षक भिंत थडी फाेडून रस्ता करीत आहे. यामुळे घाटानजीकच्या गावांना पुराचा धाेका संभावत आहे. वैनगंगा, चुलबंद, बावनथडी नदीसह इतर ठिकाणी हा प्रकार दिसुन येत आहे. दुसरीकडे अवैध उत्खननाने शासनाचा काेट्यवधींचा महसूल बुडत आहे.भंडारा जिल्ह्याला नैसर्गिक वरदान लाभले आहे. विशाल पात्र असलेल्या वैनगंगा नदीसह चुलबंद, बावनथडी, सुर आदी नद्या आहेत. या नद्यातील रेतीवर आता जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील तस्करांचा डाेळा आहे. दशकभरापूर्वी जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक घाट हाेते. मात्र गाेसे प्रकल्पाच्या निर्मितीनंतर बुडीत क्षेत्रातील घाटांची संख्या ६० वर आली आहे. मात्र गत १४ महिन्यांपासून जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तेथे माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत आहे. चांदमारा, आष्टी, धुटेरा, गुडेगाव, धानाेरी, यनाेटा, बेटाळा, राेहा, माडगी, ढाेरवाडा, निलज, ब्राम्हणी, उमरवाडा, रेंगेपार यासह चुलबंद नदीवरील गवराळा, नांदेड, धर्मपुरी, इटान घाटावर माेठ्या प्रमाणात उपसा हाेत आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करुन त्याची ट्रक, टिप्पर आिण ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रेती तस्कर नदीची नैसर्गिक संरक्षक भिंत थडी फाेडतात. प्रत्येक घाटावर नदीथळ फाेडून रस्ता तयार केल्याचे दिसून येते. मात्र या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नसते. केवळ रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई करुन महसूल विभाग त्यांना साेडून देते. परंतु पर्यावरणाचे हाेणारे नुकसानीकडे कुणाचेही लक्ष नाही. पवनी तालुक्यातील घाटावर जाण्यासाठी चक्क कालवा मार्गाचा उपयाेग केला जाताे. दाेन ते अडीच किलाेमिटर कालव्यावरुन रेतीचे ट्रक धावत असल्याने कालव्याच्या अस्तित्वाला धाेका निर्माण झाला आहे.नदीची थडी फाेडल्याने सर्वाधिक धाेका पावसाळ्यात तीरावरील गावांना बसताे. फाेडलेल्या थडीतून पुराचे पाणी थेट गावात शिरते. गत ऑगस्ट महिन्यात महापूर आला हाेता. या महापूराचा सर्वाधिक फटका रेतीघाटानजीक असलेल्या गावांना बसल्याचे दिसून येते. रेतीतस्कर आपल्या फायद्यासाठी नदीचे अस्तित्वच धाेक्यात आणत आहे.
नदीपात्रात माेठाले खड्डे रेती उत्खननासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जाताे. सर्व नियमांना तिलांजली देवून खडक लागेपर्यंत रेतीचा उपसा केला जाताे. अनेक ठिकाणी रेती उपसामुळे माेठाले खड्डे पडले आहेत. याखड्यामुळे अपघातांची भीती असते. परंतु हा सर्व प्रकार बिनबाेभाट सुरु असून याकडे कुणाचेही लक्ष नाही.रस्त्यांची लागली वाट रेती वाहतूकीमुळे घाटाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याची वाट लागली आहे. अहाेरात्र अवजड वाहतूक हाेत असल्याने रस्ते उखडले आहे. ठिकठिकाणी माेठाले खड्डे पडले आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे.