आपल्या धाडसाला सलाम! जिवाची बाजी लावून 7 बालकांचे वाचवले प्राण; भंडाऱ्यातील घटना

By मुकेश चव्हाण | Published: January 12, 2021 09:13 AM2021-01-12T09:13:44+5:302021-01-12T09:20:54+5:30

आपल्या जिवाची बाजी लावून 07 बालकांचे जीव वाचवणारे अजित कुर्जेकर यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. 

Salute your courage! Saved the lives of 7 children by risking their lives; Incidents in the treasury | आपल्या धाडसाला सलाम! जिवाची बाजी लावून 7 बालकांचे वाचवले प्राण; भंडाऱ्यातील घटना

आपल्या धाडसाला सलाम! जिवाची बाजी लावून 7 बालकांचे वाचवले प्राण; भंडाऱ्यातील घटना

Next

भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. 9 जानेवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश मिळाले होते. मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच देशभरातून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला. या दुर्घटनेने उभा महाराष्ट्र तसेच देशही हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृत शिशूंच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यातील सरकारी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

9 जानेवारीच्या मध्यरात्री लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढण्यात आलं. या कर्मचाऱ्यांमध्ये परिचारक अजित कुर्जेकर यांचा देखील समावेश होता. आपल्या जिवाची बाजी लावून 07 बालकांचे जीव वाचवणारे अजित कुर्जेकर यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. 

तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

आसमंत भेदणारा बाळंतिणींचा हंबरडा-

आग लागताच बाहेर थांबलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनी नवजात कक्षाकडे धाव घेतली. ओल्या बाळंतिणी व त्यांचे नातेवाईक डॉक्टर व नर्सेसमागे धावत होते. प्रशासनाने सगळ्या मातांना पोर्चमध्ये बसवून ठेवले. नेमके कुणाचे बाळ दगावले व कुणाचे वाचले, हे बराच वेळ स्पष्ट होत नव्हते. इनबॉर्न विभागातील मुले वाचल्याचे स्पष्ट झाले व दिलासा मिळाला पण आऊटबॉर्न विभागात आग व धूर अधिक होता. तिथली मुले संकटात असल्याचे समजताच झालेला मातांचा आक्रोश सुरू झाला.

भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी- नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितले. 

घटना अत्यंत वेदनादायी - राहुल गांधी

भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Salute your courage! Saved the lives of 7 children by risking their lives; Incidents in the treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.