तुमसरातील ड्राय क्लिनर्समधून ५ कोटींचे घबाड जप्त; ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 4, 2025 21:14 IST2025-02-04T21:13:19+5:302025-02-04T21:14:23+5:30
तुमसर मधील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

तुमसरातील ड्राय क्लिनर्समधून ५ कोटींचे घबाड जप्त; ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
भंडारा : तुमसर शहरातील इंदीरानगर परिसरात असलेल्या राजकमल ड्राय क्लिनर्स या दुकानातून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी तुमसर मधील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून दुपारी स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने दुपारी २ वाजता अचानकपणे या दुकानात धाड घातली. यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचे लक्षात आले. पथकाोणे ही रक्कम मोजली असता ती ५ कोटी रुपये भरली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुण्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तुमसरमधील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाने ही रक्कम बँकेतून अनधिकृतपणे काढली होती. ‘त्या’ व्यक्तीला ही रक्कम दिल्यावर या बदल्यात त्याला ६ कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर मिळालेल्या रकमेतून ५ कोटी बँकेत जमा करून त्याला एक कोटी रुपयांचे कमिशन मिळणार होते. मात्र, पोलिसांना गोपनिय माहिती मिळाले, आणि हा प्रकार उघडकीस आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी या मोहिमेला दिशा दिली. ही रक्कम जमा करून पोलिसात आणण्यात आली आहे. ॲक्सिस बँकेचे रिजनल व्यवस्थापक तसेच रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. ते काही वेळात तुमसरमध्ये पोहचत आहेत.
ही रक्कम कुठे जाणार होती, कशासाठी दिली जाणार होती. तो मध्यस्त कोण या संदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.