दरोडेखोरांचे मास्क व हातमोजे आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:57+5:302021-03-09T04:37:57+5:30
परसोडी नाग येथील ग्रामीण बँकेची खिडकी तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सायरन वाजल्याने दरोडेखोरांच्या हाती मोठे काही ...

दरोडेखोरांचे मास्क व हातमोजे आढळले
परसोडी नाग येथील ग्रामीण बँकेची खिडकी तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सायरन वाजल्याने दरोडेखोरांच्या हाती मोठे काही लागले नाही. केवळ संगणकाचा मोडेम चोरीस गेला. लाखांदूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी परसोडी येथील गुराखी बँक परिसरातील शेतशिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. तेव्हा दोन कापडी हात मोजे व मास्क आढळून आले.
या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार मनोहर कोरेटी, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अंमलदार नितीन बोरकर, संदीप रोकडे, मनिष चव्हाण यांनी घटनास्थळ गाठले. भंडारा येथून श्वान पथकाला बोलाविले. श्वानाने घटनास्थळापासून तब्बल अर्धा किमी अंतरापर्यंत माग दाखविला. त्यावरून दरोडेखोर पायी आले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तब्बल तीन तास बँकेत रोकड चोरीचा प्रयत्न केला. सायरनच्या आवाजाने घाबरुन दरोडेखोर पसार झाले. दरोड्याचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून दोन पेक्षा अधिक दरोडेखोर यात सहभागी असल्याची माहिती आहे. पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यानी घटनास्थळी भेट देऊन तपासा संबंधाने पोलिसांना सूचना दिल्या आहे.