मधमाशांच्या हल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:05 IST2021-02-03T18:05:04+5:302021-02-03T18:05:45+5:30
Bhandara News : शेतशिवारातील आंब्याच्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळाला काही पक्ष्यांनी डिचल्यामुळे मधमाशा उडू लागल्या.

मधमाशांच्या हल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
लाखनी (भंडारा) - मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचामृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे बुधवारी सकाळी घडली. शेतात जात असताना मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. भीमराव राजाराम बोरकर (६०) रा. साकोली असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते साकोली येथील निवासस्थानाहून बुधवारी सकाळीच ८ वाजताच्या दरम्यान स्वगावी रेंगेपार येथे आले.
शेतातील नादुरूस्त बोरवेलचे काम पाहण्यासाठी दुचाकीने शेताकडे गेले. त्याच दरम्यान शेतशिवारातील आंब्याच्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळाला काही पक्ष्यांनी डिचल्यामुळे मधमाशा उडू लागल्या. शेताकडे जाणाऱ्या भीमराव बोरकर यांच्यावर अचानक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मनोहर बोरकर, चंदू बोरकर यांनी तातडीने लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून भंडारा येथे हलवण्यात आले. परंतु भंडाराला पोहचल्या नंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.