तुमसर शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा अन्यथा थेट हकालपट्टी; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:45 IST2025-10-29T19:45:06+5:302025-10-29T19:45:33+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा इशारा : तुमसर शहरातील अतिक्रमण हटणार

Remove encroachments on railway land in Tumsar city within seven days or face immediate eviction; Railway administration warns
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरातील रेल्वेच्या हद्दीत मागील अनेक वर्षांपासून झालेल्या अतिक्रमणांवर अखेर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांना सात दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास थेट हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील रेल्वे हद्दीत दुकाने, घरं, शेड व व्यावसायिक कामांसाठी जागा बळकावण्यात आल्या आहेत. या अतिक्रमणामुळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सात दिवसांत अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिले.
दुकानदारात चिंता, तर प्रशासन ठाम
या कारवाईमुळे शहरात भीती आणि चर्चेचे वादळ सुरू झाले आहे. काही नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली असली तरी प्रशासन कारवाईवर ठाम आहे. अनधिकृत बांधकामांना कोणतीही मुभा मिळणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाचे सर्वेक्षणाचे कार्य जोमात
दरम्यान, शहरातील दुकानदारांना या कारवाईमुळे धास्ती बसली आहे. काही ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. रेल्वे पोलिस, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मंगळवार, २८ ऑक्टोबरपासून सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.
दुकानदारांवर कोसळणार आर्थिक संकट
मागील अनेक वर्षांपासून रेल्वे क्रॉसिंग परिसरात रिकाम्या जागेवर दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. त्यातून रोजगार प्राप्त होत आहे. आता अचानक रेल्वे प्रशासन अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवत असल्याने त्या दुकानदारांवर आर्थिक संकट कोसळून उपासमारीची वेळ येणार आहे. याकडे प्रशासन लक्ष देणार काय? असा प्रश्न आहे.
७ दिवसांत निर्णय न झाल्यास थेट बुलडोझर
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नोटिसीनंतर जर अतिक्रमण हटवले गेले नाही, तर पुढील आठवड्यात थेट कारवाई करून बांधकामे पाडण्यात येतील. त्यामुळे तुमसर शहरात पुढील काही दिवसांमध्ये रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाचा इशारा
रेल्वेची जमीन ही राष्ट्रीय संपत्ती असून, ती बेकायदेशीररीत्या दुकानदारांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. नोटीस मिळाल्यानंतर कोणतेही बहाणे चालणार नाहीत, असा कडक इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
२ उड्डाणपूल बांधकामाला होणार सुरुवात
तुमसर शहरात वाहतुकीची कोंडी होणे नित्याचे झाले आहे. वाढती वाहनांची संख्या व अरुंद रस्ते यावर उपाय म्हणून देव्हाडी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगवर ३० कोटी, तर शहरातील खापाटोली रेल्वे क्रॉसिंगवर ३५ कोटी रुपये उड्डाणपुलाकरिता मंजूर करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामात अतिक्रमण हे अडचणीचे ठरत असल्याने रेल्वे प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे.