धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:41+5:302021-07-08T04:23:41+5:30
जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ७५ टक्के ...

धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा
जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ५० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ७५ टक्के भरला आहे.
यापूर्वी या प्रकल्पातून उन्हाळी धान पिकांसाठी तीन टप्प्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी खरीप पिकांसाठी ही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती असली तरी शेतकरी वर्ग खरीप हंगामातील धान नर्सरी उन्हाच्या दाहकतेने कोमेजून जात आहेत. सुरूवातीच्या काळात पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी, आता मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल व चिंतातुर झाला आहे.
शेतकऱ्यांच्या धान नर्सरी व धान पीक रोवणी करीता बावनथडी प्रकल्पाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. मोहाडी तालुक्यातील, डोंगरगाव, कुशारी, काटेबाम्हणी, धोप, टाकला, उसर्रा, सालई (बू) ताडगाव, सालई (खु) सिहरी, मोरगाव महालगाव, नेरला, बपेरा, पालडोंगरी, टांगा, पिंपळगाव, अकोला टोला, आंधळगाव, मलिदा, आदी परिसरात पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी दिली आहे. त्यामुळे प्रखर उन्हाने पेरणी केलेले धान नर्सरी कोमेजून गेले आहे.
बहुतेक शेतकऱ्यांच्या धान नर्सरी रोवणी योग्य आले असल्याने धान पीक लागवडीकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे. त्यातच पावसाअभावी धान नर्सरी मरणासन्न अवस्थेत सापडले आहे. व धान रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतात पेरणी केलेल्या धान नर्सरी वाचविण्यासाठी व धान रोवणी करीता आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामात धान पिकाला सोडण्याची मागणी केली आहे अन्यथा डोंगरगाव व मोहाडी येथील चौकात शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देवा ईलमे यांनी निवेदनातून दिला आहे.