पावसाच्या हजेरीने दिलासा
By Admin | Updated: October 6, 2014 23:06 IST2014-10-06T23:06:51+5:302014-10-06T23:06:51+5:30
महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते.

पावसाच्या हजेरीने दिलासा
अखेर परतीचा मान्सून बरसला : नागरिकांची उकाड्यातून सुटका
ंभंडारा : महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने सर्वांसाठी आल्हाददायक ठरले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असताना यावर्षी पावसाची काही दिवसांचा अपवाद वगळता क्वचितप्रसंगी पाऊसाने हजेरी लावली होती. सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर मोठे अस्मानी संकट ओढवल्यानंतर त्यांनी कसेबसे धानाची रोवणी आटोपली. त्यानंतर काही दिवसासाठी पावसाने जणू रजा घेतल्याची परिस्थिती होती. 'कधी ऊन्ह कधी पाऊस' अशा अस्मानी परिस्थितीत बळीराजाच्या चेहऱ्यावर मोठ्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न आवासून दिसून येत होता. दुबारनंतर तिबार पेरणीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची पऱ्हे करपले तर काहींनी असलेल्या साधन सामुग्रीवरून ते जगवून रोवणी आटोपली. मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरश: दडी मारली होती. धानपिके गर्भावस्थेत असताना धानाला शेवटच्या एका पाण्याची नितांत गरज आहे. मात्र उपलब्ध सिंचन व्यवस्था विद्युत विभागाच्या भारनियमनामुळे कुचकामी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संकट उभे ठाकले होते.
ज्यांच्याकडे साधन उपलब्ध होते त्यांनी सिंचन करून धानाला जगविले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची यात फजिती झाली. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी करपू लागल्याने त्यांनी देवाकडे पाण्यासाठी साकळे घालणे सुरू केले होते. दरम्यान, हिवाळ्याच्या तोंडावर सध्या उकाडा वाढल्याने जणू उन्हाळाच लागल्याची प्रचिती मागील काही दिवसांपासून येत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी पाण्यासाठी देवाला साकळे घालून आर्जव करीत असल्याचे दिसून येते होते. आज सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारी ३ च्या सुमारास अचानकपणे आभाळ ढगांनी दाटून आले. मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरूवात झाली. अर्ध्या तासात २५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अचानकपणे कोसळलेल्या या पावसामुळे वातावरणातील उकाडा आल्हाददायक स्थितीत परिवर्तीत झाला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. बऱ्यापैकी झालेल्या या पावसाने शेतातील करपू लागली धानपिके काही प्रमाणात का होईना वाचण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)