मातीमिश्रीत रेती घाटांचा होणार लिलाव
By Admin | Updated: January 18, 2016 00:28 IST2016-01-18T00:28:37+5:302016-01-18T00:28:37+5:30
नदीपात्रात रेती संपल्याने केवळ माती आहे. रेती नसतानाही पर्यावरण व भूजल विभागाने तालुक्यताील आठ रेती घाट लिलावात काढले आहे.

मातीमिश्रीत रेती घाटांचा होणार लिलाव
आठ रेतीघाटांचा समावेश : पर्यावरण व भूजल विभागाने दिली हिरवी झेंडी
मोहन भोयर तुमसर
नदीपात्रात रेती संपल्याने केवळ माती आहे. रेती नसतानाही पर्यावरण व भूजल विभागाने तालुक्यताील आठ रेती घाट लिलावात काढले आहे. याप्रक्रियेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली. दुसरी लिलाव प्रक्रिया २८ जानेवारीला होत आहे. रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यातील बावनथडी व वैनगंगा नदीपात्रात वाळू साठा नाही. तरी सन २०१५-१६ करीता रेतीघाटांचा लिलाव प्रक्रियेत समावेश करण्यात आला. पर्यावरण व भूजल विभागाचे कडक नियम असतांनी या नियमांना डावलून लिलाव होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाने रेती (वाळू) निर्गतीकरिता सन २०१५-१६ या वर्षासाठी ई-निविदा व ई-अॅक्शन सूचना दिल्या. १५ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या रेतीघाट ई-निविदा व ई लिलावात बोली प्राप्त झाली नाही त्यामुळे दुसऱ्या चरणात पुन्हा रेतीघाटांच्या निविदा काढण्यात आल्या.
तुमसर तालुक्यातील चारगाव (देव्हाडी) वैनगंगा नदी, बाम्हणी, वैनगंगा नदी, लोभी (दिग्धाघाट) बावनथडी, आष्टी (आंजनविहिरी) बावनथडी, तामसवाडी वैनगंगा नदी, देवनारा, बावनथडी, वारपिंडकेपार (बावनथडी), मांडवी, वैनगंगा नदीचा समावेश आहे. यापैकी मांडवी हा घाट सर्वात मोठा आहे. शासनाने घाटांची किंमत लाखो रुपये ठेवली. गट क्रमांक ठरवून दिला. पर्यावरण विभागाने रेतीचे उत्खनन यांत्रिक उपकरणाने करता येणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
मांडवी घाट वगळता वैनगंगा व बावनथडी नदीपात्रात वाळू साठा उपलब्ध नाही. नदी पात्रात खोल खड्डे पडले आहेत. एकेकाळी माडगी रेतीघाट प्रसिध्द होता. प्रचंड वाळू उपसामुळे या घाटावर मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. नियमानुसार या रेतीघाटातून ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत रेती उपसा करण्यात येईल.
सप्टेंबर महिन्यात रेतीघाट लिलावाची मुदत संपली. पंरतु अजूनही प्रचंड वाळू उपसा सुरुच आहे. रेती घाट लिलाव प्रक्रीयेत ग्रामपंचायत, ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. लिलाव प्रक्रियेपूर्व नदीघाट व गावापर्यंत रस्ते तयार करण्याची गरज असून महसूल प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे, सध्या नदीघाट बंद असूनही रेती सर्रास चोरून नेण्यात येत आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.