शिक्षकांचे प्रश्न निकाली निघणार
By Admin | Updated: February 17, 2016 00:18 IST2016-02-17T00:18:58+5:302016-02-17T00:18:58+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे मागील अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत.

शिक्षकांचे प्रश्न निकाली निघणार
राज्य अधिवेशन यशस्वी : जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचा सहभाग
भंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे मागील अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. यातील अनेक प्रश्न निकाली काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांनी शिक्षकांना सदर आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अधिवेशन मुंबईतील पाटणी मैदानावर झाले. या अधिवेशनाला राज्यभरातून लाखो शिक्षक उपस्थित झाले होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद कावळे यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी उपस्थित शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर मार्गदर्शन केले. यात केंद्रात सातवा वेतन आयोग लागू होताच राज्यातही तो लागू झाला पाहिजे. अशी भूमिका शिक्षकांनी ठेवली होती. शिक्षणमंत्री कावळे यांनी, संगणक प्रशिक्षणासाठी एक वर्षाची मुदत वाढ जाहिर केली. संपूर्ण राज्याचे रोष्टर एकत्रीत करुन आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.
यासोबतच शिक्षकांना वैद्यकिय उपचारासाठी ‘कॅशलेस’ योजना राबवून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या पेंशनबाबत हे विचार करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. या अधिवेशनात शिक्षकांचे नेते संभाजी थोरात यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न मान्यवरांसमोर उपस्थित केले. मुलांना आनंदी शिक्षण देण्यासाठी मुलांना आनंदी ठेवा असे प्रतिपादन थोरात यांनी केले आहे. यावेळी प्रधान सचिव नंदकुमार यांनीही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी सर्व शिक्षकांनी ताकदीने प्रयत्न करण्याचे प्रतिपादन केले. अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात विकास गायधने, संजीव बावनकर, महेश गावंडे, राजन सव्वालाखे, नामदेव गभणे, माधव कोल्हे, केसर मासुरकर यांच्यासह शेकडो शिक्षकांनी हजेरी लावली. (शहर प्रतिनिधी)