जिल्ह्यात 738 कोटी रुपयांचा 38 लाख क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST2022-02-10T05:00:00+5:302022-02-10T05:00:58+5:30
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आधारभूत केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. विविध समस्यांचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला. मंगळवार ८ फेब्रुवारीपासून आधारभूत धान खरेदी बंद करण्यात आली असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख ६ हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 738 कोटी रुपयांचा 38 लाख क्विंटल धान खरेदी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात आधारभूत केंद्रावर ३८ लाख ६ हजार ७०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत ७३८ कोटी ५० लाख ३ हजार ९९४ रुपये असून जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ४५० शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आधारभूत केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. विविध समस्यांचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला. मंगळवार ८ फेब्रुवारीपासून आधारभूत धान खरेदी बंद करण्यात आली असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख ६ हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. सर्व धान सर्वसाधारण ग्रेडचा असून १९४० रुपये प्रतीक्विंटल या हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. सर्वाधिक धान खरेदी तुमसर तालुक्यात ७ लाख २४ हजार ८२५ क्विंटल झाली असून सर्वात कमी खरेदी साकोली तालुक्यात ४ लाख ४३ हजार २०४ क्विंटल आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे धानाची विक्री झाली असून त्यामुळे आता शासकीय धान खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.
४५७ कोटी रुपयांचे चुकारे थकीत
- जिल्ह्यात ७३८ कोटी ५० लाख ३ हजार ९९४ रुपयांची आधारभूत किमतीने धान खरेदी झाली आहे. यापैकी २८१ कोटी ५९ लाख ९७ हजार १६ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अद्यापही ४५६ कोटी ९० लाख ६ हजार ९७८ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील असे सांगण्यात येत आहे.
बोनसच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता
- आधारभूत केंद्रावर विकलेल्या धानाला बोनस मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लोकप्रतिनिधींनी सुरुवातीला बोनस दिला जाईल असे जाहीर केले होते. मात्र आता धान खरेदी संपली तरी अद्याप बोनसचा कुठेही उल्लेख होत नाही. बोनस ऐवजी शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी दिली जाईल असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गतवर्षी क्विंटलमागे ७०० रुपये बोनस मिळाला होता.