लाखांदूर : मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता सर्व सामान्य जनतेच्या विरोधी निर्णय घेवून फक्त उद्योगपतीच्या स्वार्थ साधणारे हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे, असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. लाखांदूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.तालुका काँग्रेस कमेटीच्या तवीने मिरा-कन्हैय्या सभागृहामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार सेवक वाघाये यांची उपस्थिती होती. मनोहर राऊत, ताराचंद मातेरे, देविदास चौधरी, सवॉस दुनेदार, जगन जंगम, ज्ञानेश्वर गणविर, अनिल खोब्रागडे, राजु कोचे, धनपाल ठलाल यांच्या सह ४० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. तर भाजपाचे कार्यकर्ते लालदास देशमुख यांनीही काँग्रेस प्रवेश केला व लाखांदूर येथे युवा नेतृत्वात काम करणारी आर्यन्स ग्रुप संघटनेचे प्रमुख धम्मदीप रंगारी व सहकारी ७० युवकांनी काँग्रेस प्रवेश केला. माजी मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले की, ज्या लोकांनी आश्वासन देवून मते मागितली. त्यांनी त्यांची पूर्तता न करता आपल्याकडे पाठ फिरविली आहे. लाखांदूर तालुका हा दुर्लक्षित व गरीब लोकांचा आहे. या ठिकाणी कुठलेही मोठे उद्योग नाहीत. विकास कामे नाहीत. चार पदरी रस्ते नाहीत. या भागाशी माझी नाळ जुळली आहे. तरी या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या तुमच्या निवडणुकीत दाखवून दिले पाहिजे.सेवक वाघाये म्हणाले कार्यकर्त्यांनी एकत्र येवून भेदभाव विसरुन समोर येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष बळकटी करणे गरजेचे आहे. संचालन तालुका प्रभारी मनोहर महावाडे तर आभार प्रदर्शन संतोष दोनाडकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
जनतेची फसवणूक करणारे सरकार
By admin | Updated: February 11, 2015 00:45 IST