तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता
By Admin | Updated: October 18, 2014 01:07 IST2014-10-18T01:07:13+5:302014-10-18T01:07:13+5:30
तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे

तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता
भंडारा : तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर विभागाचीही दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच रविवारला मतमोजणीच्या दिवशी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोणतीही निवडणूक म्हटली की, त्याची बेरीज वजाबाकी, अंदाज सांगणाऱ्यांची कमी नसते. प्रत्येकच गावात असे काही तज्ज्ञ असतात. या तज्ज्ञांना मतदारसंघातील कोण माणूस कुणाचे काम करू शकतो, अखेरच्या क्षणी कुणी कोणते चिन्ह चालविले, कुणाची हवा होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर राहू शकतो, याची इत्यंभूत माहिती असते. त्यासाठी ते निवडणुकीच्या पुर्वीपासूनच आकडेमोड करीत असतात.
अशा निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे स्थानिक पातळीवरील या तज्ज्ञांचे अंदाज बहुतांश वेळा खरे ठरतात, असे अंदाज खरे ठरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असते. निवडणूक झाली की, प्रत्येकच उमेदवार अशा तज्ज्ञांकडून अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. यापूर्वीचे अंदाज खरे निघाले म्हणून उमेदवारांनाही या तज्ज्ञांच्या गणितीय कौशल्यावर विश्वास असतो. परंतु, यावेळी या तज्ज्ञांचे गणितीय अंदाजही कोलमडण्याची चिन्हे आहेत.
मागील दोन दशकात पहिल्यांदाच या तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. १५ वर्षानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी तर २५ वर्षानंतर भाजपा व शिवसेना या पक्षांनी स्वतंत्ररित्या निवडणुका लढविल्या आहेत.
प्रत्येक मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशिवाय बसपा, मनसे या पक्षांसह अपक्ष उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात होते. यावेळसारखी विचित्र राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाही. भल्याभल्यांना या निवडणुकीचे अंदाज बांधणे कठिण होऊन बसले आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात किमान तिरंगी सामना पहायला मिळत आहे.
तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही मतदार संघामध्ये तिरंगी लढती आहेत. या तिन्ही मतदारसंघात विजयी उमेदवार काठावर निघेल, असे मानले जात आहे. भंडारा जिल्ह्यात कोण कमी आणि कोण अधिक, याचा अंदाज बांधला जात आहे. मतदानाची टक्केवारी, झालेले मतदान आणि मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर या जागांवरील तज्ज्ञांचा दावाही संभ्रमात सापडला आहे. ते पाहता या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. रविवारला (दि.१९) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
राजकीय तज्ज्ञच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य गुप्त वार्ताविभाग यावेळी पहिल्यांदाच संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले अहवाल पाठविले असले तरी संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सूचविलेल्या नावांबाबत ते स्वत:च साशंक असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावरून यावेळच्या निवडणुका गुप्तचरांसोबतच दीर्घ अनुभवी राजकीय दिग्गजांची परीक्षा पाहणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)