'बीएच' वाहनांचा वेळेत कर भरा; अन्यथा ३६ हजार दंड भरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:27 IST2025-09-12T15:26:20+5:302025-09-12T15:27:09+5:30
Bhandara : नव्या नियमानुसार वाहनांना बीएच सीरीजचा दिला जातोय विशिष्ट नंबर

Pay tax on 'BH' vehicles on time; otherwise pay a fine of Rs 36,000
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनानिमित्त सतत परराज्यात प्रवास करणाऱ्यांसाठी आरटीओने 'बीएच' सीरीज सुरू केली आहे. बीएचसाठी दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागतो, अन्यथा प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो. एक वर्ष कर न भरल्यास वर्षाला ३६ हजार दंड लागू होते.
काय आहे 'बीएच' सीरीज ?
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन चालविण्यासाठी तेथील पासिंग करून घ्यावी लागत असे. आता नव्या नियमानुसार परराज्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी बीएच सीरीजचा नंबर दिला जान आहे.
महाराष्ट्रात वाहनांचा वाहन क्रमांक एमएचने सुरू होतो. नव्या बीएच मालिकेनुसार वाहनाचा क्रमांक, वाहनाचे नोंदणी वर्ष नमूद असते. याप्रमाणे वाहन क्रमांक दिला जातो. बीएच सीरीजच्या वाहनामुळे अनेकांचा इतर राज्यात होणारा त्रास कमी झाला आहे.
देशभरात वाहन चालवा
२५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची चारचाकी वाहने तसेच २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची दुचाकी वाहन बीएच सीरीजचा नंबर प्राप्त करण्यासाठी बँक खात्याचे विवरणपत्र तपासले जाते. बीएच सीरीजचा लाभ एका व्यक्तीस केवळ एकाच वाहनासाठी दिला जातो. तसेच कर भरणा केलेला आहे की नाही याची तपासणी केली जात असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. बीएच सीरीज मिळाल्यानंतर देशभरात कोठेही वाहन चालविण्याची मुभा असते.
कुठून अन् कसा घ्यायचा नंबर ?
बीएच सीरीजचा वाहन क्रमांक घेण्यासाठी ज्या राज्यातील जिल्ह्यात स्थलांतर झाले आहे तेथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून हा नवीन पद्धतीचा क्रमांक तुमच्या वाहनासाठी घेता येऊ शकतो.
नंबर मिळवण्यासाठी हे आहेत निकष
केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, बीएच सीरीजचा क्रमांक हा संरक्षण विभागातील कार्यरत व्यक्ती, केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र तसेच राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांचे कर्मचारी यांना हा क्रमांक मिळू शकतो. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनासुद्धा सदरील क्रमांक मिळू शकतो. परंतु, खासगी कंपनीचे कार्यालय चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यात असले पाहिजे अशी अट आहे.
दोन वर्षांसाठी कर आकारणी
बीएच क्रमांक घेतल्यानंतर कर आकारणी केली जाते. दर दोन वर्षाला एकदा कर आकारणी केली जाते. जर वाहन मालकाने हा कर थकवला तर रोज १०० रुपयांच्या दंडाची आकारणी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
१०० रुपये दंड टॅक्स न भरल्यास प्रतिदिन आकारला जातो.
परराज्यात प्रवास करणाऱ्यांसाठी बीएच सीरीज नंबर हिताचा झाला आहे. त्यामुळे देशात प्रवासात अडचण येण्याची शक्यता निर्माण होत नाही.