तुमसरातील मत्स्य विभागाची कामे होतात भंडाऱ्यातून
By Admin | Updated: September 18, 2014 23:30 IST2014-09-18T23:30:00+5:302014-09-18T23:30:00+5:30
तुमसर येथे मागील ३० वर्षापासून सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी हे कार्यालय सुरु आहे. चार वर्षापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले होते. याशिवाय येथे चार कर्मचारी होते.

तुमसरातील मत्स्य विभागाची कामे होतात भंडाऱ्यातून
तुमसर : तुमसर येथे मागील ३० वर्षापासून सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी हे कार्यालय सुरु आहे. चार वर्षापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले होते. याशिवाय येथे चार कर्मचारी होते. कालांतराने त्यांचेही स्थानांतरण झाले. सध्या स्थितीत एकच चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयाशी संबंधित कामे सध्या थेट भंडाऱ्यातून सुरु आहे.
तुमसर शहरात भाड्याच्या इमारतीत सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाचा पत्ता शोधूनही सापडत नाही. कारण या कार्यालयाचा साधा फलक तेथे नाही. चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी सकाळी १० वाजता कार्यालय सुरु करतात व सायंकाळी ५ वाजता बंद करतात. सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले तेव्हापासून हे पद रिक्त आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाल्यामुळे ते पदही रिक्त आहे. सध्या नागठाणा येथून चतुर्थश्रेणी कर्मचारी येथे दररोज येतात. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित कामे भंडाऱ्यातून होत आहेत. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मासेमार बांधवांना योग्य मार्गदर्शन व्हावे याकरिता राज्य शासनाने तालुकास्तरावर मत्स्य कार्यालय सुरु केले आहेत. परंतु या कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तुमसर येथील कार्यालयांतर्गत जलसंपदा विभागाची १५ तलाव तर जिल्हा परिषदेचे १२० ते १२५ तलाव येतात. या कार्यालयांतर्गत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना मदत करणे, माहिती देणे, प्रशिक्षण देणे आदी कामे केली जातात. परंतु कर्मचारी व अधिकाऱ्यांअभावी सर्व कामे येथे कायदोपत्री सुरु आहेत.
या कार्यालयाचे दार उघडेच असतात. या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलवर स्वच्छता करणारे झाडू व डस्टबीन टेबलवरच ठेवलेले दिसून आले. राज्य शासनाचे हे कार्यालय आहे का? हे यावरून दिसून येते. शासनाचे भाड्यापोटी हजारो रुपये व्यर्थ जात आहेत.
आर्थिक भुर्दंड
यासंदर्भात मच्छींद्रनाथ मत्स्य पालन सहकारी संस्थेचे सचिव संजय मोहनकर म्हणाले, या कार्यालयामार्फत जाळे, डोंगे, निविदा, मार्गदर्शनासंदर्भात कार्यालयाशी संपर्क येतो. परंतु कर्मचारी व अधिकारी नसल्याने भंडारा येथे जावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)