आता वनकर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे भत्ते
By Admin | Updated: July 27, 2016 00:36 IST2016-07-27T00:36:42+5:302016-07-27T00:36:42+5:30
जीव धोक्यात घालून जंगलात अहोरात्र गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.

आता वनकर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे भत्ते
वनमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन :
गणवेश, प्रवास व आहार भत्त्याचा समावेश
भंडारा : जीव धोक्यात घालून जंगलात अहोरात्र गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवाार यांनी वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे गणवेश, प्रवास व आहार भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथील दालनात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुनगंटीवार यांनी, वन कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यात वनरक्षक, वनपाल यांचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधार करण्याची मागणी होती. यावर मुनगंटीवार यांनी, १५ दिवसांचे आंत निर्णय घेवून वेतनश्रेणी वाढवून देण्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे गणवेश भत्ता ५ हजार १६७ रूपये, आहार भत्ता व कायम प्रवास भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले.
वनरक्षक व वनपाल यांच्या आंतरवृत्तीय बदल्या विशेष परिस्थितीत करण्याचे मान्य केले. संपकालीन ११ दिवसांचे कपात केलेला पगार देण्याचे यावेळी मंत्र्यांनी मान्य केले. वनपालांची सरळसेवा भरती न करण्याचे मान्य करण्यात आले. यासोबतच वनरक्षक, वनपाल यांचेवर होणाऱ्या वनसंरक्षणातील हल्ल्या हा गंभीर विषय असून त्याला गंभीरतेने घेण्याचे व उपाय करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.
शिष्टमंडळात विजय मेहर, चंद्रकांत कांबळे, सुनिल बोंडीवले, प्रविण डोंगरखेडकर, गाजी शेख, ए. के. निमगडे, आर. एच. पवार, सुनिल फुलझेले, एस. एस. तळपाळे, एच. जी. घुगे, डी. टी. कोहाड आदींचीे उपस्थिती होती.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनकर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांना समाधानकारक उत्तर व आश्वासन दिले. वनमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वनकर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
वेतन मिळणार पहिल्या तारखेला
वनरक्षक व वनपाल यांचे वेतन १० तारखेपर्यंत करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली होती. यावेळी मुनगंटीवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच देण्यात यावे असे आदेश दिले. यात हयगय कारणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी लागलीच दिले. सेवाजेष्ठता यादी दरवर्षी प्रकाशित करून त्यानुसार पदोन्नती करण्यात येईल. प्रत्येक वनविभागात गस्ती पथक तयार करून ६० हजार रूपये किंमतीपर्यंतची मोटरसायकल देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.