जिल्ह्यात १२५२ अंगणवाड्यांमध्ये होणार नव्याने नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:53+5:302021-03-09T04:37:53+5:30
भंडारा : जिल्ह्यात उन्हाच्या झळा आता दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे ग्रामविकास ...

जिल्ह्यात १२५२ अंगणवाड्यांमध्ये होणार नव्याने नळजोडणी
भंडारा : जिल्ह्यात उन्हाच्या झळा आता दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या नव्या आदेशाने जिल्ह्यातील १२५२ अंगणवाड्यांमध्ये नव्याने नद्या जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे या अंगणवाड्या चालविल्या जातात. कोरोना संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाड्या बंद आहेत. सध्या अंगणवाड्यांमध्ये मुलांची हजेरी राहत नसली तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मात्र दररोज जावे लागत आहे. सध्या बालकांचे वजन मोजणे, आहार देणे, लसीकरण, मुलांचे आरोग्य तपासणी, घरबसल्या अभ्यास व पालकांना मार्गदर्शन अशा विविध कामांसाठी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीत जावेच लागत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ४९३ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय होती. मात्र, आता नव्याने शासनाने शंभर दिवसांत अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्याचा आदेश दिला आहे. ग्रामविकास विभागाने अंगणवाडीला नळ कनेक्शन व स्वच्छतागृह देणे बंधनकारक केले आहे. यासाठी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाने यात विशेष लक्ष घातले आहे. यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत विविध कामांसाठी गती दिली आहे. यात जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वतःची इमारत आहे, तर काही ठिकाणी इतर इमारतींचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात २०१, मोहाडी तालुक्यात १७२, तुमसर तालुक्यात २२९, लाखनी तालुक्यात १५२, साकोली तालुक्यात १५१, पवनी तालुक्यात १९६, लाखांदूर १५१ अंगणवाड्यांमध्ये नव्याने नळजोडणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाडी मदतनीसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बॉक्स
अंगणवाडी मदतनीसांची पायपीट थांबणार
ग्रामविकास विभागाने प्रत्येक अंगणवाडीला नळ कनेक्शन व स्वच्छतागृह बंधनकारक केले असल्याने आता प्रत्येक अंगणवाडीला शंभर दिवसांत नळकनेक्शन मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी होणारी अंगणवाडी मदतनीसांची पायपीट आता थांबणार आहे. शिवाय स्वच्छता राखण्यासही मोठी मदत होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही नव्याने होणारी नळजोडणी ग्रामीण भागातील मुलांना दिलासा देणार आहे.