Nashik Bus fire: जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल पतंगे
By निलेश जोशी | Updated: October 8, 2022 17:18 IST2022-10-08T16:52:49+5:302022-10-08T17:18:45+5:30
Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली.

Nashik Bus fire: जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल पतंगे
- नीलेश जोशी
बुलढाणा - नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्याने खिडकीतून उडी मारत स्वत:ला वाचविले. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला.
बुलढाणा पाटबंधारे विभागात विशालचे वडील कार्यरत आहेत. मधल्या काही दिवस विशाल हा सुलतानपूर येथील एका कॉलेजवर कामाला होता. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी तेथील काम त्याने सोडले होते. मुंबईत त्याला अजंता फार्मामध्ये साडेचार लाखाचे प्रतीवर्षाचे पॅकेज मिळाल्याने यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सद्वारे तो मुंबई येथे जात होता. १० ऑक्टोबरलाला तो कामावर रुजू होणार होता. मात्र ७ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता येणारी ही चिंतामणी ट्रॅव्हलची बस पावसामुळे उशिरा आली होती. दुसरीकडे सकाळी साखर झोपेत असलेल्या विशाल शंकर पतंगेला अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने जाग आली. त्यामुळे त्याने घाबरतच परिस्थितीचा अंदाज घेत बसच्या खिडकीतून बाहेर उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्यास जात असतानाच जिवावरचे मोठे संकट टळल्याचे तो सांगत होता. त्याच्या डोक्याला बसमधून बाहेर पडताना इजा झाली आहे. गंभीर स्वरुची अशी इजा नसली तरी या गंभीर स्वरुपाच्या अपघातामुळे त्याला धक्का बसला आहे. नाशिक येथील सिलव्हर हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रिहाना पठाणासह मुलगी व नातू सुखरूप
मुळचे मेहकरचे असलेले परंतू कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या रिहाना पठाण (४५) या मेहकर येथे त्यांचा मुलगा जावेद पठाण यास भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी फराह पठाण (२२) आणि सौहाद पठाण (९) वर्षाचा चिमुकला होता. मेहकरमधून चिंतामणी ट्रॅव्हल्समधून हे तिघेही मुबंईसाठी बसले होते. तिघेही सुखरूप असून रिहाना पठाण यांचा मुलगा नाशिकमधील रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी सायंकाळ पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे त्यांच्या घरी सध्या कोणी नाही. घरालाही कुलूप होते.
सासऱ्यांना भेटण्यासाठी आले होते भिसे
मेहकर येथूनच अपघातग्रस्त बसमध्ये बसलेले भागवत लक्ष्मण भिसे हे मुळचे वाशिम जिल्ह्यातील आंचल येथील रहिवाशी आहेत. कामानिमित ते कल्याण डोंबिवली परिसरात स्थायीक झाले आहेत. त्यांचे सासरे अमृता मोरे हे आजारी असल्याने भागवत भिसे हे त्यांना भेटण्यासाठी मेहकर येथे आले होते. भागवत भिसेही या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.