A murder case was eventually registered for the death of a student | विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देकुडेगावचे प्रकरण : गळा आवळून ठार केल्याचे स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव येथील विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी अखेर आठ दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून आता आरोपींना शोधण्याचे आव्हान लाखांदूर पोलिसांपुढे आहे.
सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रामागील एका शेतात त्याचा मृतदेह आढळला होता. तो ४ नोव्हेंबर रोजी रात्रकालीन प्रो-कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. परंतु घरी परतच आला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर लाखांदूर ठाण्यात सोहम बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. अखेर तीन दिवसानंतर धानाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
सोहमचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडून होता. मृतदेहापासून ७० ते ७५ फुट दूरवर त्याच्या चपला पडलेल्या होत्या. तसेच गळ्याजवळ आवळल्याचे दिसत होते. परंतु पोलीस याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. राजकीय आणि सामाजिक संघटनानी याप्रकरणी आवाज उठविला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली. मात्र पोलीस उत्तरीय तपासणी अहवालावर अडून बसले होते. नातेवाईकांसह गावकऱ्यांतही यामुळे संताप व्यक्त केला जात होता. पोलीस मात्र गुन्हा दाखल करीत नव्हते.
अखेर बुधवारी सोहमचा उत्तरीय तपासणी अहवाल पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी गुरुवारी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. आता सोहमचा खुन कुणी आणि कशासाठी केला. याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन लाखांदूर पोलिसांपुढे आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनोहर कोरेटी करीत आहेत.

बालकदिनी मिळाला न्याय
आठवड्याभरापासून पालकांसह नातेवाईक सोहमच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. परंतु पोलीस कुणाचेही ऐकण्यात मनस्थितीत दिसत नव्हते. अखेर बुधवारी याप्रकरणी उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यावरुन १४ नोव्हेंबर या बालकदिनी सोहमच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बालक दिनी एका विद्यार्थ्याला न्याय मिळाला.
आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान
सोहम मानकर याचा खुनच झाल्याचे आता सिध्द झाले आहे. गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. मात्र त्याचा खुन कुणी केला या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्यापही पोलिसांना सापडले नाही. खुनाचा गुन्हा तर दाखल झाला. मात्र आरोपी शोधण्याचे आव्हान लाखांदूर पोलिसांपुढे आहे. दहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्याचा खुन कशासाठी करण्यात आला, याचाही शोध घेण्याची गरज आहे. लवकरच आरोपी जेरबंद होतील असे पोलीस सांगत आहेत.

Web Title: A murder case was eventually registered for the death of a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.