पालिका कर्मचारी बेमुदत संपावर
By Admin | Updated: July 16, 2014 23:55 IST2014-07-16T23:55:29+5:302014-07-16T23:55:29+5:30
विविध मागण्या व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत भंडारा, तुमसर व पवनी येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील समस्या

पालिका कर्मचारी बेमुदत संपावर
भंडारा : विविध मागण्या व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत भंडारा, तुमसर व पवनी येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील समस्या आवासून समोर आल्या आहेत.
शासनाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नसून मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संघटनेने आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे. संघटनेने ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०० टक्के वेतन देण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे, अनुकंपाधारकांना तात्काळ विनाशर्त नोकरी देण्यात यावी, थकित वेतनासाठी शासनाने विशेष अनुदान त्वरीत द्यावे, कपात केलेल्या रकमा नगर परिषदेला त्वरीत देण्यात यावे, २००५ नंतर सेवानिवृत्त झालेल्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यात यावे, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून द्यावी, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, नगर पालिकांचा सुधारित आराखडता तयार करण्यात यावा, मुख्यधिकारी पदासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, कालबद्ध पदोनत्ती तात्काळ लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, संचालक विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात संवर्ग कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात यावा, नक्षलग्रस्त भागात १५ टक्के अधिक भत्ता द्यावा या मागण्यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा, शिक्षण, महसूल व अग्निशमन या अत्यावश्यक सेवा सेवाविभागातील कर्मचारी सोडून भंडारा, तुमसर व पवनी या तिन्ही नगरपालिकातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. दरम्यान, भंडारा नगरपालिकेतील ३०० कर्मचाऱ्यांपैकी ७५ कर्मचारी कार्यरत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
पवनी, तुमसरातही संपाचा
नागरिकांना फटका
संपामुळे सफाई कामगारांनी बाजाराची सफाई केली नाही. परिणामी बाजार चौकात भाजीपाला विखुरलेला होता. पिण्याच्या पाण्याअभावी हाल सुरू आहेत. पथदिवे बंद असून घाण पसरली आहे. साफसफाई करणारे कर्मचारी भर पावसात संपस्थळी तंबूत तळ ठोकून बसले आहेत. पवनी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विभागीय आयुक्तांची भेट घेण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप भेट झाली नसल्याचे संपकर्त्यांनी सांगितले. (लोकमत चमू)