राजापूरच्या ‘यू टर्न’ने घेतले अनेकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:25 AM2018-10-24T01:25:34+5:302018-10-24T01:26:06+5:30

तुमसर ते कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील राजापूर ‘यू टर्न’ने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. अपघात प्रवणस्थळाचा फलकही दिसत नाही.

Many of Rajapura's 'Yu Turn' | राजापूरच्या ‘यू टर्न’ने घेतले अनेकांचे प्राण

राजापूरच्या ‘यू टर्न’ने घेतले अनेकांचे प्राण

Next
ठळक मुद्देअपघाताची मालिका : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, वळणावर वाढली मोठाली झुडुपं, भरधाव अवैध प्रवासी वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर ते कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील राजापूर ‘यू टर्न’ने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. अपघात प्रवणस्थळाचा फलकही दिसत नाही. उलट या वळणावरच मोठाली झुडूपे वाढली आहेत. मंगळवारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा राजापूर यू टर्न चर्चेत आला आहे.
भंडारा आणि मध्यप्रदेश राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणजे तुमसर - कटंगी २५३ क्रमांकाचा आंतरराज्यीय मार्ग होय. या मार्गावरून अहोरात्र प्रवासी वाहतूक सुरु होते. त्यासोबतच अवजड वाहनेही धावत असतात. गुळगुळीत असलेल्या या रस्त्यावर नाकाडोंगरी लगतच्या राजापूर शिवारात धोकादायक वळण आहे. काटकोनात असलेल्या या यू टर्न वर समोरून येणारे वाहन दिसत नाही. समोर एकदम वाहन आले की चालकाचे नियंत्रण जाते आणि अपघाताला आमंत्रण मिळते. मंगळवारी सकाळी अशाच पद्धतीने अपघात झाला. मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून प्रवासी घेऊन जीप तुमसरकडे निघाली होती. मार्गातील प्रवासी घेत ही जीप राजापूर जवळ पोहचली. त्यावेळी समोरच्या वळणावर चालकाला बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराचे चुरी टाकणारे ट्रॅक्टर अचानक दिसले. ट्रॅक्टरचा समोरील भाग पार करून जीप समोर जाणार त्याच वेळी घात झाला. जीप ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन आदळली. यात तीन महिला प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर आठ जणांना गंभीर दुखापत झाली.
याच ठिकाणी वळणावर मोठाले झुडूपे वाढली आहेत. या झुडूपांमुळेही समोरून येणारे वाहन दिसत नाही. लहान सहान अपघात तर नित्याची बाब झाली आहे. अपघात प्रवण स्थळ असताना बांधकाम विभागाने या ठिकाणी साधे फलक लावण्याचे सौजन्यही दाखविले नाही. तसेच वाढलेले झुडूपेही तोडले नाही. आतापर्यंत या ठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
भंडारा जिल्ह्यात राजापूर सारखीच अनेक अपघात प्रवण स्थळे आहेत. या स्थळांवर कोणत्याही प्रकारची सूचना फलकही लावले नाही. अनेक ठिकाणी गतीरोधकाची गरज असताना गतीरोधकही लावण्यात आले नाही. राजापुरच्या वळणावर दोन्ही बाजूला गतीरोधक असते तर आज तीन महिलांचे प्राण नक्कीच वाचले असते. परंतु बांधकाम विभागाने गतीरोधक लावले नाही. एवढेच नाही तर त्याठिकाणी रस्त्यावर पांढरे पट्टेही मारले नाही. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. तर पोलीस आणि परिवहन विभागाने अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश आणण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यात पोलीस आणि परिवहन विभाग असमर्थ ठरल्याने वाहनचालकांचे मनोबल वाढले आहे.
अवैध वाहतूकदारांची स्पर्धा अंगलट
रस्त्यावरील प्रवासी आपल्यालाच मिळावे यासाठी भरधाव वाहने चालविण्याची जणू स्पर्धाच तुमसर ते कटंगी मार्गावर लागलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरधाव वाहतूक सुरु असते. अनेकदा तर पायदानवरही प्रवासी उभे केले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसतात. अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहने कालबाह्य झाली असून भंगार वाहनातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. पोलीस हप्ता मिळविण्यात धन्यता मानत आहे. तर परिवहन विभागाचे अधिकारी या मार्गावर आल्यास वाहतूकदार एकमेकांना सूचना करून त्या काळापुरती वाहतूक बंद करतात. परिणामी अपघातात निष्पाप प्रवाशांचे जीव जातात. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र याला आवर कोण घालणार असा प्रश्न आहे.

Web Title: Many of Rajapura's 'Yu Turn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात