‘त्या’ मुख्य सूत्रधाराला अटक
By Admin | Updated: April 2, 2015 01:03 IST2015-04-02T01:03:08+5:302015-04-02T01:03:08+5:30
‘डॉली की डोली’ या हिंदी चित्रपटात वधू लग्न झाल्यानंतर रात्री दागिने व नातेवाईकांसोबत पळ काढते.

‘त्या’ मुख्य सूत्रधाराला अटक
तुमसर : ‘डॉली की डोली’ या हिंदी चित्रपटात वधू लग्न झाल्यानंतर रात्री दागिने व नातेवाईकांसोबत पळ काढते. येथे दिवसाढवळ्या मंदिरातून वधूने बनावटी नातेवाईकांसोबत पळ काढला होता. असाच प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला. या प्रकरणात वधूच्या बनावटी नातेवाईक (मुख्य आरोपी) तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे. वधू फरार असून येथे वधूची आई, वडील व मामासुद्धा बनावट असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी तथा वधू व इतरांविरुद्ध पोलिसांनी भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
१८ मार्च रोजी तुमसर येथील बारेलाल अहीरवार यांचे लग्न तिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील तरुणीशी नवेगाव येथील संतोषी माता मंदिरात झाला होता. विवाहानंतर एका तासानंतर वधू व तिच्या नातेवाईकांनी दागिन्यांसह पळ काढला होता. फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्यांनी तुमसर पोलीस ठाणे गाठले होते.
घटना तिरोडा तालुक्यातील असल्यामुळे तिरोडा येथे तक्रार करण्याचे सांगण्यात आले होते. तिरोडा पोलिसात दोन दिवसापूर्वी वधू व तिच्या साथीदारांची तक्रार देण्यात आली. तिरोडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यात मुख्य आरोपी धनराज राहांगडाले रा.विहिरगाव याला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीने वधूचे नातेवाईक बनावट असल्याची माहिती दिली. त्यात बनावटी आईवडील, मामांचा समावेश आहे. सध्या वधू फरार आहे. मुख्य आरोपी धनराज राहांगडाले याची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. फरार आरोपींचा कसून शोध सुरु आहे.
तिरोडा तालुक्यात अशी टोळी सक्रीय असल्याचे समजते. मुख्य आरोपी धनराज राहांगडाले याला पोलिसांनी बोलते केल्यावर त्याने ५० हजार रुपये खर्च केल्याची कबुली दिली. पुढे तपासात गुढ उकलण्याची येथे शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)