Magnus thieves escaped from a running tractor | धावता ट्रॅक्टरसोडून मॅग्नीज चोरांनी काढला पळ

धावता ट्रॅक्टरसोडून मॅग्नीज चोरांनी काढला पळ

ठळक मुद्दे११ टन मॅग्नीज जप्त : गोबरवाही जंगल शिवारातील प्रकार, ८ जणांचा समावेश, तपासणी पथकाने केला पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोबरवाही : तुमसर तालुक्यातील बाळापूर (डोंगरी बु.) खाण परिसरातून उच्च कोटीच्या मॅग्नीजची वाहतुक करित असताना पेट्रोलींग पथकाने पाठलाग केल्यानंतर धावता ट्रॅक्टर सोडून आठ मॅग्नीज चोरट्यांनी जंगलात पळ काढला. विशेष म्हणजे तपासणी पथकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. यात त्यांच्यात झडपही झाली. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मॉयल परिसराला लागून असलेल्या गोबरवाही जंगल शिवारात घडली.
माहितीनुसार मॉयल येथील डोंगरी बु. खाण परिसरात उच्च कोटीचे मॅग्नीज आहे. याच परिसरातून तस्कर मॅग्नीजची अवैध वाहतुक करित असतात. याच्यावर सुरक्षा रक्षक असलेल्या पेट्रोलींग पथकाची नेहमी करडी नजर असते. रविवारी सकाळी असाच थरारक प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घडला.
बाळापूर (डोंगरी) परिसरातून ट्रॅक्टरमधून ११ टन मॅग्नीजची अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. याच वेळी पेट्रोलिंगवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला. सुरक्षारक्षक पाठलाग करित असल्याचे लक्षात येताच. ट्रॅक्टर क्र. एम एच ३६ झेड १७९२ मध्ये बसलेले सहा ते सात इसमांनी धावत्या ट्रॅक्टरमधून उडी घेतली. मागे असलेल्या पथकाने ट्रॅक्टर चालकाला थांबण्याची सुचना केली. मात्र त्याने ऐकले नाही. क्षणभराच्या आतच ट्रॅक्टर चालकानेही उडी घेवून जंगलाच्या दिशेने पळ काढला. विना चालक असलेला ट्रॅक्टर काही वेळातच सखल भागात असलेल्या झुडपांमध्ये जाऊन कोसळला.
ट्रॅक्टर उलटताच घटनास्थळी सुरक्षारक्षकांचे पथकही पोहोचले. याचवेळी सर्वातप्रथम ट्रॅक्टरमधून उडी घेतलेल्या सहा ते सात जण तिथेच लपून बसले होते. सुरक्षा रक्षक तसेच या चोरट्यांमध्ये झडपही झाली. सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करुन त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरक्षा रक्षकांनी चोख प्रतीउत्तर दिल्याने ट्रॅक्टरचालकासह आठ मॅग्नीज चोरट्यांनी तेथून पळ काढला. याबाबत मॉयलच्या सुरक्षा निरीक्षकांनी गोबरवाही पुलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनास्थळाहून रक्षकांनी २ लाख रुपये किंमतीचे ११ टन मॅग्नीज जप्त केले आहे. सदर ट्रॅक्टर गणेशपूर येथील एका व्यक्तीचे असल्याचे सांगण्यात येते. तपास सुरु असून या घटनेची तालुक्यात दिवसभर चर्चा होती.

Web Title: Magnus thieves escaped from a running tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.