ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी दोन वर्षापूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत १३५० आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. आता महामारीच्या काळात या योजनेत कोरोना उपचाराचा समावेश केल्यास रुग्णांसाठी मोठी संजीवनी ठरु शकते.केंद्र सरकारने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत देशातील मान्यताप्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा दोन वर्षापूर्वी शुभारंभ झाला होता. देशातील दहा कोटी ४७ लाख कुटुंबाना लाभ देण्याची ही महत्वाकांक्षी योजना होय.या योजनेंतर्गत अनेक कुटुंबानी आतापर्यंत लाभ घेतला आहे. मात्र ही योजना कार्यान्वित झाली त्यावेळी कोरोना संसर्गाचा कोणताही प्रादूर्भाव नव्हता. खरे पाहता त्यावेळेस कोरोना आजारही कुणाला माहित नव्हता. आता कोरोना संसर्ग संपूर्ण देशभर पसरत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. या आजारावर शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातही उपचार केले जातात. खाजगी रुग्णालयात उपचार करताना मोठी रकम मोजावी लागते. ही रकम सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरची असते. अशा स्थितीत आयुष्यमान भारत योजनेत कोरोना आजाराचा समावेश केल्यास लाखो कुटुंबाना त्याचा फायदा मिळू शकतो.एकट्या भंडारा जिल्ह्यात एक लाख ३४ हजार ४४८ लाभार्थ्यांची नोंद घेण्यात आली होती. त्यात शहरी १५ हजार ४९० आणि ग्रामीण एक लाख १८ हजार ९५८ लाभार्थ्यांचा समावेश होता. १३५० आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणाऱ्या या योजनेत आता कोरोनाचा समावेश केल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनेत देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय किंवा खाजगी रुग्णालयातून लाभ घेता येतो. रुग्णालयातमध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया राबविली जाते. योजनेचे ई-कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्राच्या माध्यमातून उपचार केले जातात. आता सर्वत्र कोरोना संसर्ग वाढत असताना या आजाराचा समावेश आयुष्यमान भारतमध्ये केल्यास अनेकांसाठी संजीवनी ठरु शकते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी आरोग्य यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी प्रयत्न करीत आहे.नागरिकांनी कोरोनाला घाबरु नये, जागरुक रहावेजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांनी घाबरुन जावू नये, जागरुक राहून आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम असून कोरोना निर्मुलनासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
‘आयुष्यमान भारत’ ठरु शकते कोरोनात संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST
केंद्र सरकारने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत देशातील मान्यताप्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
‘आयुष्यमान भारत’ ठरु शकते कोरोनात संजीवनी
ठळक मुद्देकोरोना उपचार समावेशाची गरज : जिल्ह्यात आयुष्यमानमध्ये एक लाख ३४ हजार कुटुंब ठरले आहेत पात्र