लहान पुलावर जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:49+5:30
मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही.

लहान पुलावर जीवघेणा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीच्या लहानपुलावरून वाहतुकीस तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्यानंतरही खुलेआम वाहतूक सुरु आहे. सध्या वैनगंगा दुथडी भरून असून या लहान पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत. याप्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असून प्रशासनाने फलक लावून आपले केवळ कर्तव्य पार पाडले आहे.
भंडारा शहराजवळून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पुल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने येथून भरधाव जातात. पुरुषांसोबत महिलाही या पुलावरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे दृष्य नेहमीच दिसते.
यावर्षी पावसाळ्यात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डेही पडले आहेत. अशा स्थितीत जीवघेणा प्रवास सुरु आहे.
हा पुल वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जुना पुल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कुणीही जबरीने पुलावरुन प्रवास केल्याने अनुचित घडना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असे म्हटले आहे. याबाबतचे दोन फलक वैनगंगा नदीवरील लहान पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले आहे. प्रत्येक वाहनधारक या फलकाकडे पाहतो आणि सुसाट वाहन पळवित असल्याचे चित्र आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना नाहीत. एखादा अपघात घडल्यास मदतीलाही कुणी येण्याची शक्यता नाही. प्रशासनाने मात्र आपले कर्तव्य बजावले, परंतु नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसते.
सुसाईड पॉइंट
वैनगां नदीचे दोन्ही पुल सुसाईड पॉइंट म्हणून ओळखले जातात. गत वर्षभरात अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दीड वर्षापूर्वी एका प्रेमी युगुलाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सातत्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढ होत आहे. रात्रीबेरात्री या पुलावर कुणीही नसल्याची संधी साधून आत्महत्या केली जाते. त्यानंतर मृतदेह शोधताना मोठी कसरत करावी लागते.
पूल कायमचा बंद करा
वैनगंगा नदीवरील लहान पुलावर लोखंडी कठडे आडवे लावण्यात आले आहेत. परंतु दुचाकी वाहने हे कठडे पार करून पुलावरून प्रवास करतात. बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजू कायमच्या बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.