लाखनी तालुक्यात धान उत्पादक वळतोय प्रयोगशील शेतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:11 IST2018-11-03T22:11:07+5:302018-11-03T22:11:45+5:30
पारंपारिक पीक पध्दतीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. प्रचंड मेहनत करुनही हाती काहीच उरत नाही, त्यामुळे आता परंपरागत पीक पध्दतीला फाटा देत शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहे. लाखनी तालुक्यातील सोनेखारी येथील एका शेतकऱ्याने जलयुक्त शिवारच्या साथीने एकात्मिक पीक प्रयोग यशस्वीपणे राबविला. फळ पीक, भाजीपाला, कुकुटपालन, मुक्त गोठा पध्दत आणि शेततळ्यात मत्सपालन अशा प्रयोगातून मदतीचा नवा मार्ग स्विकारला आहे.

लाखनी तालुक्यात धान उत्पादक वळतोय प्रयोगशील शेतीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पारंपारिक पीक पध्दतीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. प्रचंड मेहनत करुनही हाती काहीच उरत नाही, त्यामुळे आता परंपरागत पीक पध्दतीला फाटा देत शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहे. लाखनी तालुक्यातील सोनेखारी येथील एका शेतकऱ्याने जलयुक्त शिवारच्या साथीने एकात्मिक पीक प्रयोग यशस्वीपणे राबविला. फळ पीक, भाजीपाला, कुकुटपालन, मुक्त गोठा पध्दत आणि शेततळ्यात मत्सपालन अशा प्रयोगातून मदतीचा नवा मार्ग स्विकारला आहे.
लाखनी तालुक्यातील सोनेखारी येथील देवराम कातोरे यांची शेती काही दिवसांपूर्वी जवळपास पडीक होती. धान पिकातून काहीही हाती येत नव्हते. त्यामुळे त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाची वाट चोखाळली. आपल्या शेतालगत जलयुक्त शिवार योजनेच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळे बांधण्यात आले. या शेततळ्यातील तुडूंब पाण्याने त्यांच्या घरी समृध्दी आणली. शेतातील विहीरी पाणी पातळी वाढल्याने त्यानी आपल्या शेतात कारले, भेंडी, पपई असे बहूविध पीक लावले. शेततळ्याच्या काठावर बोर, चीकू, आंबा आदी फळपीक लावले, आता त्यांचे पीक चांगलेच बहरत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
देवराव कातोरे यांनी आपल्या शेतात मुक्त गोठा पध्दतीचा वापर केला असून यामुळे जनावर शसक्त आणि रोगमुक्त राहत असल्याचे त्यांनी सांगितले. याच शेतात त्यांनी नाडेफ कम्पोस्ट खत आणि गांढूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. आता त्यांच्या शेतात भाजीपाला व फळपीक येवून त्यांची आर्थिक उन्नती निश्चितच होणार आहे.
पीक संरक्षणासाठी ग्रो-कव्हर
पिकांचे सर्वाधीक नुकसान होते ते किडींमुळे. पीक लहान असतांना किडींना बळी पडते हा प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच त्यांनी ग्रो-कव्हर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. संपूर्ण पीक प्लास्टिक सदृष्य ताडपत्रीने झाकण्यात आले. या तंत्रज्ञानासाठी एकरी केवळ पंधरा हजार खर्च येतो. आत आवश्यक तेवढा सुर्यप्रकाश जावून पीकही सुरक्षीत राहते. शेतकऱ्यांनी या पध्दतीचा वापर करावा असे आवाहन देवराव कातोरे यांनी केले आहे.
पारंपारिक शेती भरोशाची नाही. बहुविध पीक पध्दती व एकात्मीक पीक प्रयोग यामुळे पीक उत्पादन वाढल्याचे दिसून येते. ज्यांच्याकडे अधीक शेती आहे. त्यांनी जलयुक्त शिवारच्या साथीने बहुविध शेतीचा अवलंब केल्यास निश्चित फायदा होईल.
- पद्माकर गिरमारे,
तालुका कृषी अधिकारी लाखनी