खडकी पाणीपुरवठा योजना दुर्लक्षित
By Admin | Updated: March 13, 2015 00:42 IST2015-03-13T00:42:50+5:302015-03-13T00:42:50+5:30
मोहाडी तालुक्यात खडकी गावासाठी सन २००९-१० मध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्याला पाच वर्षाचा कालावधी लोटत असताना अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत.

खडकी पाणीपुरवठा योजना दुर्लक्षित
युवराज गोमासे करडी
मोहाडी तालुक्यात खडकी गावासाठी सन २००९-१० मध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्याला पाच वर्षाचा कालावधी लोटत असताना अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत. परिणामी ग्रामवासीयात अधिकाऱ्यांप्रती तीव्र असंतोषाची भावना आहे. योजना बंद अवस्थेत आहे. योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरीत झालेली नाही.
सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या खडकी गावासाठी पाच वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात केली गेली. या अंतर्गत गावाबाहेर टोलीवर ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली गेली. सुमारे ५ कि.मी. अंतरावरील वैनगंगा नदीकाठावर पंप हाऊस व पात्रात विहीर खोदली गेली. योजनेसाठी ४५ लाखाची अंदाजपत्रकीय तरतूद केली गेली. मात्र सन २००९-१० पासून अजूनही योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत. ग्रामवासी पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. कामांसाठी पैशाची कमतरता नसताना योजनेची कामे का पूर्ण केली गेली नाहीत. ग्रामवासीयांना पाणी का दिले जात नाही असा प्रश्न नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जात आहे. मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांच्या असंतोषात भर पडत आहे. दोन वर्षापूर्वी योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली होती. मात्र वारंवार पाच कि.मी. अंतरावरील पाईप लाईन मध्ये दोष निर्माण होत होता. पाईपलाईनला तडे जात असल्याने सुद्धा अडचणी वाढल्या होत्या. परंतु अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना केल्या नाही. त्याचा परिणाम ग्रामवासीयांना आज भोगावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. कंत्राटदाराला त्याचवेळी सूचना देऊन कामे पूर्ण करायला पाहिजे होते. असेही मत व्यक्तय होत आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना बसत असताना ग्रामप्रशासन चुप्पी साधून आहे. पाणी पुरवठा योजनेसंबंधाने एका लोकप्रतिनिधीने ग्रामसभेत प्रश्न लावून धरला होता. परंतु राजकीय वास त्या मुद्यातून दिसून आल्याने नागरिकांनी त्यास गांभीर्याने पाठींबा दिला नव्हता.
आज जवळपास अंदायपत्रकीय रकमेच्या ३९ लाखापर्यंतचा खर्च योजनेवर झालेला असताना योजना बंद असून नागरिकांसाठी वांझोटी ठरली आहे.