जीव धोक्यात घालून ‘ते’ देताहेत थंडीत पहारा

By Admin | Updated: November 8, 2014 22:32 IST2014-11-08T22:32:01+5:302014-11-08T22:32:01+5:30

लिलाव झालेल्या नदीघाटाची मुदत संपूनही रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तस्करांनी साठवून ठेवलेल्या रेतीची चौकीदारी करण्याचे आदेश तलाठी, पोलीस पाटील, कोतवालांना देण्यात आले आहे.

Keeping the life in danger, they 'keep' the guard in the cold | जीव धोक्यात घालून ‘ते’ देताहेत थंडीत पहारा

जीव धोक्यात घालून ‘ते’ देताहेत थंडीत पहारा

महसूल विभागाला आली उशिरा जाग
भंडारा : लिलाव झालेल्या नदीघाटाची मुदत संपूनही रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तस्करांनी साठवून ठेवलेल्या रेतीची चौकीदारी करण्याचे आदेश तलाठी, पोलीस पाटील, कोतवालांना देण्यात आले आहे. परंतु थंडीच्या दिवसात कोणतेही संरक्षण नसताना हे कर्मचारी जीव धोक्यात घालून कुडकुडत्या थंडीत खडा पहारा देत आहेत. रेती तस्करांकडून त्यांच्या जिवीताला काही झाल्यास त्याची हमी कोण घेणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
भडारा जिल्ह्यात लिलाव नदीघाटाची मुदत संपलेली आहे. तरीसुद्धा रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तालुक्यातील दाभा, बेटाळा, कोथुर्णा नदीघाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. या रेती भंडारा शहरालगतच्या रिंगरोड व टाकळी विद्युत विभागाच्या कार्यालयामागे मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आलेली आहे.
रेतीचा हा साठा जेसीबीच्या माध्यमातून ट्रकामध्ये भरून मध्यरात्री या रेतीची वाहतूक सुरू आहे. नवीन सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर यावर नियंत्रण आणण्यासाठी भंडाराचे तहसीलदार सुशांत बनसोडे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील, तलाठी व कोतवालांना साठविलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यांची चौकीदारी करण्याचे लेखी आदेश दिले आहे. यासाठी हे कर्मचारी जीव धोक्यात घालून पहारा देत आहेत.
उशिरा आली जाग
महसूल विभागाच्या कारवाईला न जुमानता रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करीत आहेत. ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास असतानाही निर्बंध लावण्याचे टाळत आले. मात्र जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्यानंतर उपसा करून आणलेल्या व साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक होऊ नये, याकरिता तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना पत्र देऊन रेती साठविलेल्या परिसरात खडा पहारा देण्याचे आदेश दिले आहे. हे आदेश रेतीच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने करण्यात आले असले तरी हे पोलीस पाटील जीव मुठीत घेऊन चौकीदाराच्या भूमिकेत ही जबाबदारी सांभाळत आहेत.
इथे आहे रेतीसाठा
भंडारा-वरठी मार्गावरील टाकळी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामागील मोकळ्या जागेत तसेच रिंग रोड, पिंगलाई, खोकरला, जमनी या भागात रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येत आहे. साठविलेल्या रेतीची दिवसा वाहतूक न करता मध्यरात्री जेसीबीच्या माध्यमातून ट्रक व टिप्परमध्ये रेती भरून नागपूरकडे पाठविण्यात येते. मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक सुरु आहे. नवीन सरकार राज्यात आल्यानंतर महसूल प्रशासनाने रेतीघाट व साठविलेल्या परिसरामध्ये भादंवि १४४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु केली आहे.
गावातील कामे रखडली
गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांची जबाबदारी असते. परंतु महसूल विभागाने ही अतिरिक्त जबाबदारी टाकल्यामुळे गावाकडे दुर्लक्ष होणार आहे. पोलीस पाटलांच्या मुख्य जबाबदारीकडे महसूल प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे गावातील जी जबाबदारी आहे, ती कामे रखडली आहेत.
पोलीस पाटलांना धमक्या
आता कुठल्याही संरक्षणाव्यतिरिक्त रेतीसाठी चौकीदाराची भूमिका निभवावी लागणार आहे. यात त्यांना रेती तस्करांकडून धमक्या मिळत असल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. या कामासाठी महसूल किंवा गृहविभागाने मदत केलेली नाही. ज्या रेतीसाठ्यावर त्यांची नियुक्ती केली आहे तिथून त्यांच्या गावाचे अंतर दूरवर असल्याने स्वत:च्याच खर्चाने त्यांना तिथे पोहचायचे आहे. यासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास त्यांना होत आहे.
‘इकडे आड - तिकडे विहीर’
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु असल्याने महसूल प्रशासनाने त्यांच्या निवासाची किंवा भोजनाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ‘इकडे आड - तिकडे विहीर’ अशा स्थितीत पोलीस पाटलांसह महसूल विभागाचे कर्मचारी सापडले आहेत. मात्र वरिष्ठांचे आदेश असल्याने महसूल कर्मचाऱ्यांना ते पाळणे गरजेचे आहे. यात पोलीस पाटलांना नाहक जुंपण्यात आल्याने त्यांच्यामध्ये प्रशासनाप्रति रोष पसरला आहे. (शहर / नगर प्रतिनिधी)

Web Title: Keeping the life in danger, they 'keep' the guard in the cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.