‘जय’ची पर्यटकांना भुरळ
By Admin | Updated: March 8, 2015 00:21 IST2015-03-08T00:21:47+5:302015-03-08T00:21:47+5:30
न्यू नागझिरा अभयारण्यातून दीड वर्षापूर्वी उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात दाखल झालेला जय नामक वाघ या अभयारण्याची शान ठरला आहे.

‘जय’ची पर्यटकांना भुरळ
लक्ष्मीकांत तागडे पवनी
न्यू नागझिरा अभयारण्यातून दीड वर्षापूर्वी उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात दाखल झालेला जय नामक वाघ या अभयारण्याची शान ठरला आहे. जयने घातलेल्या भुरळीमुळे त्याला बघायला मोठ्या संख्येने पर्यटक या अभयारण्यात येत आहेत.
देखणा चेहरा, दिसायला सुंदर, भारदस्त शरीरयष्टी, चपळ, हुशार आदी वैशिष्ट्यांमुळे जय वाघाने पर्यटकांना या अभयारण्यात येण्याकरिता मोहीनी घातली आहे. या परिसरात आता जय नाव सर्वांच्या परिचयाचे झाले असून त्याच्या चर्चेमुळे जय ने या अभयारण्याला वेगळीच ओळख दिली आहे.
दीड वर्षापूर्वी जय वाघ अंतर कापून, अनेक अडथळे, मानवी वस्त्या पार करून गोंदिया जिल्ह्यातील न्यू नागझिरा अभयारण्यातील जंगलातून पवनी नजिकच्या उमरेड, कऱ्हांडला अभयारण्याच्या जंगलात दाखल झाला. तेव्हापासून तो येथेच रमला आहे.
जय हा या अभयारण्यात दूरपर्यंत फिरतो. या अभयारण्याच्या पाहुणगाव, चिचखेडा, कोरंभी महादेव या जंगलामध्ये मुक्तपणे फिरतो. पूर्ण भरून असलेली मरू नदीत पोहत जावून भिवापूर, उमरेड, करांडला अभयारण्यातील जंगलात जातो व परत चार आठ दिवसांनी इकडे येतो. येथे या अभयारण्याव्यतिरिक्त पवनी वन परीक्षेत्रातील सिरसाळा, कन्हाळगाव, सावरला, भुयार पर्यंतच्या जंगलात मुक्तपणे जय विहार करतो. जय ने दूरपर्यंत येथे आपल्या सीमा निर्धारीत केल्यामुळे दुसरा कोणताही वाघ येथे भटकत नाही.
अतिशय हिम्मतबाज व दणकट असलेला देखणा जय माणसाला घाबरत नाही. या जयने अनेक वेळा माणसासोबत असणाऱ्या बैलांवर हल्ला करून मारले. पण न्यू नागझिरा अभयारण्यात माणसांना पाहून असणाऱ्या जय ने माणसावर सध्यातरी हल्ला केलेला नाही. जय हा उमरेड कऱ्हांडला अभयारण्याची शान ठरला आहे. जयच्या नावाने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे पवनी तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रात अजूनच भर पडणार आहे.