मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पारंपरिक शेतीत आमूलाग्र बदल करीत पीक पद्धतीत बदल स्वीकारून धान पिकाऐवजी फळबाग लागवड केली. दोन एकर जागेत फळबाग लावत इतर शेतकऱ्यांना नवी दिशा दिली. यात लिंबू, आंबा, सीताफळ, फणस, जांभूळ आदी फळझाडांची शास्त्रशुद्ध पद्धतीत लागवड केली. आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकविण्यात आला. निश्चितच धान पिकापेक्षा दोन पैसे अधिक मिळण्याचा नवा मार्ग शोधत शेतीत उत्साह निर्माण केला.लाखनी तालुक्यातील पालांदूरशेजारील जेवणाळा येथील हरहुन्नरी कर्तबगार शेतकरी विनायक सोमाजी बुरडे यांनी धान पिकाच्या शेतीत नवे बदल स्वीकारलेले आहेत. तब्बल नऊ एकरात भाजीपाला व फळबागायत लावली. यात दोन एकरात फळबाग व सात एकरात भाजीपाला लावलेला आहे. ठिंबक व मल्चिंगचा आधार घेत वर्षभर सदाबहार शेती फुलवली. पावसाळ्याच्या दिवसात बाजारपेठेत दुर्मीळ असणारी भाजीपाल्याची पिके घेतली. त्यामुळे निश्चितच भाव अधिक मिळाला. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासह इतर राज्यात पिकणाऱ्या भाज्या विनायक बुरडे यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने आपल्या शेतात पिकविल्या. परिसरातील शेतकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान शेती कमी करून बागायत व त्यात आंतरपीक म्हणून भाजीपाल्याचे नवे अभ्यासात्मक दालन खुले केले.फळ बागायत तीन वर्षांची झाली असून, देखणी व डौलदार बाग मन मोहून टाकते. तालुका कृषी अधिकारी किशोर पाथरीकर लाखनी यांनी आपल्या संपूर्ण चमूसह भेट दिली. फळबागायतीची छाटणी कशी करायची, या विषयावर मार्गदर्शन केले. बागायतीचे केलेले नियोजन स्तुत्य असल्याचे सांगितले. आंतरपिकात वालफल्ली अर्थात वालाच्या शेंगा, पोपट, बरबटी, चवळा आदी भाजीपाल्यांचे पीक अधिक पैसे देणारे ठरले. १० बाय १० फूट अंतरावर सरळ रेषेत फळझाडांची लागवड केली आहे. यामुळे सूर्याची किरणे झाडाच्या बुंद्यापर्यंत पोहोचायला मदत होते. झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे फळे, फुले यायला निसर्गतः मोठी मदत मिळते.
आंतरपीक नफा देणारे - जमिनीचा उतार निसर्गतः सुस्थितीत करीत भर पावसाळ्यात भाजीपाला व्यवस्थित पिकला. पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा आपल्या मातीत इतर भाजीपाला होतो याचा अभ्यास झाला. आंतर पिकात वालफल्ली अधिक पैसे देणारी ठरली. सलग दोन एकर जागेतील ढेमस लाखमोलाचा ठरला. टमाटर, मिरची, वांगे यांची बाग पावसाळ्यातसुद्धा उत्तम टिकले.
फळबागायतीकरिता तंतोतंत नियोजनाची नितांत गरज आहे. विनायक बुरडे यांची फळबाग सुस्थितीत आहे. छाटणी कशी करायची याची माहिती पुरविण्यात आली. छाटणीचे फायदेसुद्धा सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळण्याचा प्रयत्न करावा. ठिबक मल्चिंगचा वापर करून बारमाही शेती करावी.-किशोर पाथरीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी
नवे काही करण्याच्या प्रयत्नातून शेतीत नवनवे प्रयोग सुरू आहेत. शेती हा जुगार आहे. शेतीत हरल्यास अनुभव पाठीशी असतो. जिंकल्यास इतरांना अभ्यास मिळतो. प्रत्येक शेतकरी आरंभाला बदल करण्यास कचरतो. मात्र बदलातून अपेक्षित अभ्यास हाती येतो. स्वतःसह इतरांना मिळालेला अभ्यास जीवनात आनंद देतो. हाच आनंद शेतीत मला नवी प्रेरणा देतो.-विनायक बुरडे, प्रगतशील बागायतदार, जेवणाळा