मुद्देमालासह दोघांना अटक : लाखांदूर पोलिसांची कारवाईलाखांदूर : मागील एक महिन्यापूर्वी शिक्षक विवेक मेश्राम यांचे घरी दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांच्या मुसक्या आवळण्यात लाखांदूर पोलिसांना यश मिळाले. यात चोरी गेलेल्या मुद्देमालासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक चोरींच्या अन्य घटनांचा छडा लागण्याची चिन्हे आहेत. अनिल रामभाऊ दांडेकर (२०) रा. कुर्झा रोड ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) व गुरुअण्णा ऊर्फ पिल्या सुधाकर धोत्रे (२२) रा.गंगानगर गिट्टी खदान (नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. अनिल दांडेकर याच्यावर यापूर्वी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असून तीन प्रकरणात त्याला तुरुंगवासाची हवा खावी लागली आहे. गुरुअण्णा हा सुद्धा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर शहर पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. भर दिवसा चोरी करण्यात ते तरबेज असून केस विकत घेऊन भांडे देण्याचा व्यवसाय करणारे हे चोर घरोघरी फिरतात. ज्या घराला कुलूप दिसले नेमके त्याच घरावर डल्ला मारतात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी लाखांदूरमध्ये घडला. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. अगोदरच नशा पाणी करण्याचा छंद असल्याने त्यापैकी एक अतिनशेमुळे तिथेच पडून राहीला. आणि तो पोलिसांच्या हाती लागला. पोलीसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. मागील महिन्यात शिक्षक विवेक मेश्राम यांच्या घरी चोरट्यांनी सोन्याचांदीचा ऐवज लांबविला. श्वानपथकाला बोलावूनही शोध लागला नव्हता. पोलीस निरीक्षक देवीदास भोयर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतापसिंह धरमसी यांचे मार्गदर्शनाखाली तपासाला गती दिली. चोरट्यांकडून ३८ ग्रॅम चोरी गेलेले सोने चांदीचे ऐवज ताब्यात घेतले. गुरुअण्णाने तपासात सुरुवातीला आपण अर्जुन धोत्रे रा.साकोली असे चुकीचे नाव सांगितले होते. या दोघांच्या अटकेमुळे अन्य घटनांची माहिती मिळेल, अस पोलीस निरीक्षक देवीदास भोयर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: November 16, 2015 02:01 IST