कुटुंबाचा ‘आदर्श’ नियतीने हिरावला
By Admin | Updated: December 16, 2015 00:39 IST2015-12-16T00:39:34+5:302015-12-16T00:39:34+5:30
शिकता - शिकता कमाविणे हा जरी आदर्श व उद्दात्त हेतू असला, तरी नियतीला ते मान्य नव्हते.

कुटुंबाचा ‘आदर्श’ नियतीने हिरावला
समाजमन गहिवरले : शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
मोहन भोयर तुमसर
शिकता - शिकता कमाविणे हा जरी आदर्श व उद्दात्त हेतू असला, तरी नियतीला ते मान्य नव्हते. कुटूंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या आदर्श बेसरकरवर काळाने झेप घेवून त्याला कुटुंबापासून दूर नेले. त्याच्या अचानक जाण्याने समाजमन गहिवरले.
इयत्ता १२ वी चा विद्यार्थी असलेल्या आदर्शच्या कुटुंबात वडील प्लंबरचे काम करतात. त्याचे इतर भावंडही मिळाले ते काम करतात. घरची आर्थिक स्थिती मात्र बेताचीच आहे. वीज खांबावर लटकाविलेला जाहिरातीचा बॅनर उतरविण्याकरिता लोखंडी शिडी लावून चढतांना आदर्शचा तोल गेला. ११ केव्हीच्या रोहित्राला स्पर्श झाल्यामुळे तो खाली कोसळून जागीच मृत्युमुखी पडला. मंगळवारी दूपारी १ वाजताच्या सुमरास शांती भवनाजवळ ही दुर्देवी घटना घडली. आदर्शने शिडी खांबावर लावली व क्षणात हा अपघात घडला.
जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता. फावल्या वेळेतील स्वअर्थार्जनातून शिक्षण्याची त्याची धडपड होती. बॅनर लावण्यासारखे इतर लहान कामे तो करायचा. आदर्शला तीन भावंड व एक बहिण आहे. जोखमीचे कामे करणे अत्यंत धोक्याचे असते असे कळायला लागण्याची निश्चितच वय नव्हती, पंरतु घरची आर्थिक परिस्थिती बघून तो ही कामे करीत होता. या दुर्दैवी घटनेमुळे बेसरकर कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला.
आदर्श सोबत असलेल्या मुलाचे नशिब बलवत्तर असल्याने त्याने शिडी धरली नव्हती. यामुळे तो बचावला. वीज खांबाजवळ उपहारगृह आहे. या उपहारगृहात गर्दी होती. या गर्दीतून एखाद्याने मानवीयता दाखवून जोखमीचे काम करु नको, असे हटकले असते तर आदर्शचा जीव नक्कीच वाचला असता. संवेदनशील माणसांची संख्या वाढत असल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. आदर्शने कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी चालविलेला प्रयत्न मात्र नियतीने क्षणात हिरावला. त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांसह उपस्थितांनी अश्रूंना वाट मोकळी केल्याने मन हेलावले.
विद्यार्थ्यांनी अश्रूंना वाट मोकळी केली
महाविद्यालयात दूपारी दोनच्या सुमारास आदर्श बेसरकरचा वीज धक्क्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम विश्वासच बसला नाही. मात्र, घटनेची खातरजमा होताच विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अत्यंत मनमिळावू व वर्गात गंमत करण्यात त्याचा हातखडा असल्याने तो महाविद्यालयात लोकप्रिय होता. आदर्श आपल्यातून निघून गेला याचा विश्वासच विद्यार्थ्यांना बसला नाही. सर्वांनी अश्रूंना वाट मोकळी केली.