साकोली (जि. भंडारा) : माया आणि रामकृष्ण सोनवाणे (रा. उमरझरी ता. साकोली) हे पती-पत्नी शेतात मिरच्या तोडायला गेले. पत्नी वाकून तर पती बसून मिरच्या तोडत होते. अचानक वाघिणीने पत्नीवर झडप घातली. तिच्या नरड्याला पकडले. ओढत नेऊ लागला. तेवढ्यात चार-पाच मीटर अंतरावर असलेले रामकृष्ण पत्नीच्या मदतीला धावले. वाघिणीच्या तोंडात पत्नीचा देह होता. वाघीण पत्नीला फरफटत नेत होती. रामकृष्ण लागलीच मागे धावत सुटले. हातात असलेली मिरचीची पोतडी वाघिणीवर हाणली. आरडाओरडा केली. वाघीण आणि रामकृष्ण यांच्यात मायाला आपल्याकडे ओढण्यासाठी झटापट झाली. यात पत्नीच्या कान आणि जबड्याखालील मान रक्तबंबाळ झाली. शिवाय छातीवरही मार लागला. रामकृष्ण यांच्या हिमतीमुळे त्यांनी वाघिणीच्या तोंडातून पत्नीला वाचविले.
सोनवाणे यांनी शेतात मिरच्या वांगे, टमाटर यांची लागवड केली आहे. बाजूच्या शेतातील उमराव काळसर्पे यांना वाघीण दुरून दिसली. पण, ती वाघीणच आहे की नाही, याची खात्री झाली नाही. त्यामुळे ते संशय व्यक्त करून शांत बसले. तेवढ्यात ही घटना शिवणटोला-उमरझरी शेतशिवारात शनिवारी (दि.२८) मार्च रोजी घडली. रामकृष्ण यांनी गावात फोन करून घटनेची माहिती दिली. गावकरी आले. तोपर्यंत वाघीण पळून गेली. जखमी पत्नीला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी जि. प. सदस्या माहेश्वरी नेवारे, उमरझरीचे ग्रामसेवक करण चव्हाण, प्रादेशिक विभागाचे कर्मचारी, डॉक्टरांसह मदतीला धावले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी बैठक घेऊन लगेच वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा शनिवारी दुपारी तीन वाजता पाठविला. दोन रेडकू या वाघिणीच्या पाहुणचासाठी ठेवले.
त्या वाघिणीचा व्हिडीओ व्हायरल
हीच वाघीण २४ मार्चला सायंकाळी उमरझरी-बाम्पेवाडा रस्त्यावर आली होती. चार चाकी वाहनचालकांनी त्या वाघिणीचा व्हिडीओ तयार केला. त्यावेळी ती वाघीण रस्त्यावरून शेतातील पांदण रस्त्याने जंगलाच्या दिशेने गेली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उमरझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता राजेश हटवार यांनी एफडीसीएमच्या विभागीय व्यवस्थापकांना याची माहिती दिली. त्यांनी या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांना हवा असलेला ग्रामपंचायतीचा ठरावही दिला.
१९ मार्चला पहिला बळी
बाम्पेवाडा येथील वसंता मेश्राम यांचा १९ मार्च रोजी याच वाघिणीने बळी घेतल्याचे स्थानिक मजुरांचे म्हणणे आहे. परंतु, वनविभागाला यासंदर्भात अद्याप ठोस पुरावे आढळून आले नाही, एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक अमोल नागे यांनी सांगितले. तरीही या वाघिणीवर वनविभागाने कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली होती.
जखमी वाघिणीचा सहज शिकारीचा शोध
ही वाघीण पिटेझरी, तुळमापुरी वनविभागात फिरत होती. दरम्यान, तिची झटापट एका रानडुकरासोबत झाली. यात ही वाघीण जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली होती. काही दिवसांपासून तिच्याकडून जास्त धावणे जमत नव्हते. त्यामुळे ती सहज शिकारीच्या शोधात होती. यात तिने आता या महिलेला दुसरी शिकार करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या नरडाचा घोट घेऊन रक्त प्राशन केले.
आता कोणाला आतमध्ये टाकायचं?
"शेतात मिरच्या तोडणाऱ्या महिलेला वाघाने हल्ला करून जखमी केले. दहा दिवसांपूर्वी मोहफुले वेचणाऱ्या व्यक्तीचा वाघिणीने बळी घेतला. विद्युत करंट लावून एखादा बिबट्या गेला तर आम्हाला कोठडीत टाकता. आता कोणाला कैदेत टाकायचे, असा संतप्त सवाल माजी जि. प. सदस्य नेपाल रंगारी यांना विचारला. "- गोविंद हटवार, नागपूर
Web Summary : In Sakoli, a husband bravely fought off a tigress attacking his wife in their field. The woman sustained severe injuries but survived. The tigress is believed to be injured and hunting for easy prey. Forest officials have set traps to capture it after previous attacks.
Web Summary : साकोली में, एक पति ने अपनी पत्नी पर हमला करने वाली बाघिन से बहादुरी से लड़ाई की। महिला गंभीर रूप से घायल हो गई लेकिन बच गई। माना जा रहा है कि बाघिन घायल है और आसान शिकार की तलाश में है। वन विभाग ने पिछले हमलों के बाद उसे पकड़ने के लिए जाल बिछाया है।