पवनी नगरातील शेकडो वृक्ष वाळण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:50 IST2019-06-24T00:49:43+5:302019-06-24T00:50:25+5:30
अशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : नगरातील रस्त्याच्या कडेला उपलब्ध जागेवर विविध प्रजातीच्या झाडांचे रोपटे सलग दोन वर्षे ...

पवनी नगरातील शेकडो वृक्ष वाळण्याच्या मार्गावर
अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगरातील रस्त्याच्या कडेला उपलब्ध जागेवर विविध प्रजातीच्या झाडांचे रोपटे सलग दोन वर्षे लावण्यात आले. लागवड केलेले रोपटे जगविण्यासाठी काही दिवस प्रयत्न झाले. ज्यांनी रोप लावून जगविण्याचा प्रयत्न केला त्यांची तडकाफडकी बदली झाली आणि नगरातील सर्व झाडे पोरके झाले. लक्षावधी रुपये पाण्यात गेले. हजारोच्या संख्येने लागवड केलेली झाडे पाण्याअभावी उन्हाच्या तडाख्याने वाळली.
नगरात झाडे लावून जगविण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची होती. परंतू प्रशासनाला जबाबदारी कळली नाही, परिणामी मोठ्या संख्येने झाडे वाळली. पावसाळा सुरू होणार , शासनाची झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम पुन्हा सुरू होणार म्हणून की काय, नगर पालिका प्रशासनाला जाग आली. ऐन पावसाळ्याचे तोंडावर अग्निशमन दलाचे वाहनाने पाणी टाकून वाळलेली झाडे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. त्यामुळे पालिका प्रशासनात सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा खुद्द काही नगरसेवक दबक्या आवाजात करीत आहेत.
झाडांच्या संवर्धनाप्रमाणेच नगरातील उखडलेले रस्ते , नाल्यांची स्वच्छता , नालीवरील तुटलेले कव्हर , स्ट्रीट लाईट , पाणी पुरवठा यंत्रणा अशा सर्वच बाबी दुर्लक्षीत आहेत. परंतू पालिका प्रशासन , पदाधिकारी व नगरसेवक या सर्वांनी नागरिकांच्या समस्यांकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.