भंडारा जिल्हा परिषदेसमोर मुख्याध्यापक संघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:52+5:30
वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना सुधारण्याची संधी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेकडे मागितली होती. तथापि, अधीक्षक यांच्या वर्तनात व कारभारात किंचितही फरक पडला नाही. जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर संघटनांनी अधीक्षकांना आधी निलंबित करा व नंतर चौकशी करा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांच्या समितीने चौकशी केली. चौकशी होऊन तीन आठवडे सरले.

भंडारा जिल्हा परिषदेसमोर मुख्याध्यापक संघाचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अपमानित करणे व कार्यालयात मटण पार्टी करून शिस्तभंग करणाऱ्या वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांना निलंबित करा, या मागणीसाठी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना सुधारण्याची संधी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेकडे मागितली होती. तथापि, अधीक्षक यांच्या वर्तनात व कारभारात किंचितही फरक पडला नाही. जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर संघटनांनी अधीक्षकांना आधी निलंबित करा व नंतर चौकशी करा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांच्या समितीने चौकशी केली. चौकशी होऊन तीन आठवडे सरले.
अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वेतन पथकात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाणउतारा करणे, वैद्यकीय वेतन पारित करण्यासाठी व विविध बिले काढून देण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण करणे हे नित्याचे झाल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. तसेच जाणीवपूर्वक नियमित वेतन देयके उशिरा करणे आदी बाबींमुळे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांना अपमानित करणे व कार्यालयात मटण पार्टी करून शिस्तभंग करणाऱ्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, ऑक्टोबर महिन्याचे वेतन देयक दिवाळीपूर्वी पारित करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत धरणे देण्यात आले.
या वेळी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना निवेदन सादर करण्यात आले. धरणे आंदोलनात विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यात जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रेखा भेंडारकर, सचिव राजू बांते, प्रमोद धार्मिक, अर्चना बावणे, शिक्षक परिषदेचे अंगेश बेहलपाडे, सुनीता तोडकर, राधेश्याम धोटे, सुधाकर कहालकर, सुनील घोल्लर, खोब्रागडे, अनमोल देशंपाडे, एस.डी. आरीकर, कोहपरे, राजू बारई, हिवराज उके, राजू भोयर आदींची भाषणे झाली. या वेळी विष्णू शेंडे, विलास जगनाडे, विपीन रायपूरकर, अनमोल देशपांडे, अमोल हलमारे, सुनील घोल्लर, हरीराम लांजेवार, सुनील गांगरेड्डीवार, राजू बारई, रामकृष्ण शेंडे, सेवक मने, शालीक चेटुले, गीता बोरकर, जी.एन. टिचकुले, चिंतामण यावलकर आदी १७० मुख्याध्यापक धरणे आंदोलनाला उपस्थित होते.
ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी
ऑक्टोबरचे वेतन २५ ऑक्टोबर रोजी बीडीएस निघाल्यानंतर लगेच कोषागार कार्यालयात घातले जातील, असे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी मुख्याध्यापक संघाला सांगितले.