हिरावली नऊ हजार कुटुंबांची भाकरी ! नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनच्या निर्बंधांमुळे रोजगार गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:25 IST2026-04-08T14:54:09+5:302026-04-08T15:25:31+5:30
Bhandara : नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित होण्यापूर्वी म्हणजे २०१३ पूर्वी या भागात सुमारे १० हजार जणांना वर्षातील किमान सहा महिने भाकरीची चिंता नसायची. मोहफुले गोळा करणे, तेंदुपत्ता तोडणे यातूनही हाताला काम मिळायचे.

Hiravali is the bread of nine thousand families! Employment lost due to restrictions in the core zone in Nagzira Tiger Reserve
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली (भंडारा) :नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित होण्यापूर्वी म्हणजे २०१३ पूर्वी या भागात सुमारे १० हजार जणांना वर्षातील किमान सहा महिने भाकरीची चिंता नसायची. मोहफुले गोळा करणे, तेंदुपत्ता तोडणे यातूनही हाताला काम मिळायचे. पण, व्याघ्र प्रकल्प झाला आणि रोजगारावर मर्यादा आल्या. सध्या उण्यापुऱ्या एक हजार आदिवासींनाच जंगलातून रोजगार मिळत असून सुमारे ९ हजार आदिवासींचा रोजगार या प्रकल्पामुळे बुडाल्याचे वास्तव आहे.
काही जमीनदारांकडे नागझिरा परिसराची पूर्वापार मालकी होती. जमीनदारी मोडीत निघाली आणि सिलिंग कायद्याअंतर्गत त्यांची जमीन एफडीसीएम, प्रादेशिक विभागाकडे हस्तांतरित झाली. अनेक स्थानिकांना आपण आदिवासी वंशज असल्याचे सिद्ध करता आले नाही. परिणामी, त्यांच्या नावावरील जमीन सरकारजमा झाली. आधी जमीन गेली आणि पुढे व्याघ्र प्रकल्प झाल्यानंतर उपजीविकेचा प्रश्नही बिकट झाला. स्थानिकांचा रोजगार १० टक्क्यांवर आला. आधी या परिसरात स्थानिकांना जंगलात झाडे लावणे, झाडांची निगा राखणे, झाडे कापणे आदी कामातून आदिवासी मजुरांचे घर चालत होते. आता बराच भाग कोअर झोनमध्ये गेल्यामुळे मोजक्याच स्थानिकांना रोजगार मिळत आहे. कोअर झोनलगतच्या गावांतील हजारो स्थानिकांनी पोटापाण्यासाठी शहराची वाट धरली. काही वन अधिकाऱ्यांनी याचा गैरफायदाही घेतला. सरकारी मजुरीपेक्षा कमी मजुरीत उरलेल्या स्थानिक लोकांकडून कामे करवून घेतली.
मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण
वनमजुरांची फसवणूक आणि पिटेझरीतील सागवान तस्करी प्रकरण झाकण्याचा आरोप व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांवर होत आहे. शिवणटोला गेटवरील निर्बंधांमुळे नाराजी वाढली असून, कर्मचाऱ्यांवरील विश्वास कमी झाला आहे. बाम्पेवाडा व उमरझरी येथील वाघ हल्ल्यानंतर स्थानिकांचा रोष उफाळून आला असून, आंदोलनाचे नेतृत्व जि. प.चे माजी सदस्य नेपाल रंगारी यांनी केले. त्यानंतर आता इतर स्थानिक राजकारण्यांची श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली.
वाघ, बिबट्याचे हल्ले
- ९ जानेवारी २०२६ रोजी तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.
- १९ मार्चला साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वाघाच्या हल्ल्यात शेतात मोहफुले वेचणाऱ्या वसंता मेश्राम यांचा बळी गेला.
- २८ मार्चला मिरची तोडणाऱ्या उमरझरी येथील मायाताई सोनवणे यांच्यावर वाघाचा हल्ला झाला. १ एप्रिलला उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
- १ एप्रिलला वाघाने आमगाव येथील छाया मुंगमोडे या महिलेवर हल्ला करून जखमी केले.