आमगाव/दिघोरी : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चार महिन्यांपासून रक्ताची तपासणी करणारा तंत्रज्ञ नसल्याने येथील प्रयोगशाळा बंद आहे. रक्ताचे नमुने दुसऱ्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठविल्या जात आहे. याचा सर्वात जास्त फटका गरोदर महिलांना बसला आहे.या आरोग्य केंद्रातील महिला तंत्रज्ञाची बदली इतरत्र झाली. त्यांच्या ऐवजी दुसऱ्या तंत्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली. मात्र येथील सुक्ष्मदर्शक यंत्र नादुरूस्त असल्या कारणाने त्या तंत्रज्ञाने येणे बंद केले. त्यामुळे रक्तचे नमूने इतरत्र पाठविल्या जात आहे. मात्र यामुळे आजाराचा निदान लागायला उशिर होत आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तापाची साथ असून या आरोग्य केंद्रामध्ये दिवशा २०० ते २५० रुग्ण तपासल्या जात आहेत. सर्वात जास्त तापाचे रुग्ण येत असल्याने त्यांचे रक्त तपासणीसाठी घेतल्या जाते. मात्र लगेच तापाचा निदान लागत नाही. पर्यायाने रुग्णांना खाजगी प्रयोगशाळेत रक्त तपासावे लागते. या आरोग्य केंद्रामध्ये मलेरिया, सिकलसेल, विषमज्वर, एचआयव्ही तपासणीसाठी रक्तताचे नमुने, शरिरातील रक्ताचे प्रमाण तपासल्या जाते. गरोदर महिलांचे सिकलसेल, एच.बी.ची तपासणी येथे केल्या जाते. मात्र येथे तंत्रज्ञ नसल्याने गरोदर महिलांना भंडारा येथे पाठविल्या जात आहे. पर्यायाने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.या आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील २६ गावाना आरोग्याची सेवा पुरविल्या जात आहे. मात्र आरोग्य केंद्रामध्ये तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आरोग्याची सेवा देण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे नादुरूस्त असलेला सुक्ष्मदर्शक यंत्र व तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्र तंत्रज्ञाविना
By admin | Updated: September 14, 2014 23:55 IST