टपरीचे खाणार.. त्याला आजार जडणार

By Admin | Updated: April 2, 2015 00:59 IST2015-04-02T00:59:04+5:302015-04-02T00:59:04+5:30

काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.

He will fall sick | टपरीचे खाणार.. त्याला आजार जडणार

टपरीचे खाणार.. त्याला आजार जडणार

भंडारा : काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अस्वच्छता, उघड्यावरील खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे हे आजार लवकर जडत असून, नागरिकांनी याबाबत अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील टपऱ्या, हॉटेलमधील पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच आजारांना निमंत्रण मिळत आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी किती शुद्ध आहे, याबाबत नेहमीच साशंकता असते. हे माहीती असतानाही शहरवासी त्याकडे काणाडोळा करीत असतात. तर दुसरीकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रत्येक हॉटेलची तपासणी करणे शक्य नाही, असे सांगून प्रशासन हात वर करीत असल्याने टपरीचालकांना एकप्रकारे बळच मिळत आहे.
मुख्य मार्गावर अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय आहे; मात्र या भागातच सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री केली जाते. हे पदार्थ झाकलेले नसल्यामुळे यावर माशा तसेच मोठ्या प्रमाणात धूळ बसत असते. ग्राहकदेखील याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे आजारांची लागण होण्याची शक्यता बळावत असते.
विविध भागांत रस्त्यावरील हातगाडीवर नास्ता मिळत असतो. तेथील बहुतांश पाणी अशुद्धच असते. एवढेच नव्हे, तर अनेक हॉटेलमध्येही लोखंडी ड्रम, रांजणातील पाणी पिण्यासाठी दिले जाते. रसवंत्यांतही शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे पाणी दूषित असल्याचे ग्राहकांना लगेचच लक्षात येते; मात्र तरीही तक्रार केली जात नसल्याने या व्यावसायिकांना बळ मिळत आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचीदेखील पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जात आहे. (शहर प्रतिनिधी)

कारवाई करण्याचे धाडस नाही
बसस्थानकांबाहेर असलेल्या हॉटेल्समध्ये सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. काही बसस्थानकात तर बाहेरून आलेल्या प्रवाशांना बळजबरीने खाद्यपदार्थ घेण्यासाठी तगादा लावला जातो. विशेष म्हणजे ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास असतानाही कारवाईचे धाडस केले जात नाही.

बनावट बाटल्या
उन्हाळा सुरू झाला की, मिनरल वॉटर बाटल्यांचा सुळसुळाट सुरू होतो. मोठ्या कंपन्यांची नक्कल करत अनेक ठिकाणी बनावट बाटल्या बाजारात दिसतात. या बाटल्यांना सील व झाकण लावण्याचे साधे यंत्र बाजारात उपलब्ध असून, पाण्याच्या वापरलेल्या बाटल्यांचा पुन्हा वापर केला जातो. त्यांची विक्री छोट्या टपऱ्या, बसस्थानके, ग्रामीण भागातील हॉटेल्स येथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. या बाटलीतील पाण्याच्या शुद्धतेचीही कोणतीही शाश्वती नाही. नागरिकांना बंद बाटलीतील पाणी पिल्याचे समाधान मिळते; परंतु हे पाणीही रोगांना निमंत्रण देत असल्याने ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी.
छोटी हॉटेल्स, प्रामुख्याने टपऱ्यांवर पिण्यासाठी जे पाणी असते ते अशुद्ध असते व तेच पाणी सर्व खाद्यपदार्थ बनविताना वापरले जाते. टपरी व हॉटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ शिजवणे व ते प्रत्यक्ष तयार करणे या सर्व प्रक्रियेत अशुद्ध पाण्याचा सर्रास वापर केला जातो. तसेच याबरोबर अतिशय अस्वच्छ अवस्थेत हे पदार्थ बनविले जातात. पाण्याची कमतरता असल्याने ग्राहकांनी एकदा जेवण केलेल्या प्लेट अथवा ताट त्याच त्या पाण्यात सायंकाळपर्यंत धुतली जातात. यामुळे अन्नपदार्थ व तेथील स्वच्छता सर्व रामभरोसे आहे. अस्वच्छतेच्या या वातावरणात नागरिक मनसोक्त व्यंजनांचा आस्वाद घेतात. पुढे जाऊन तेच नागरिकांच्या अंगलट येते. आजार जडतात व स्वस्त माल पुढे जाऊन महागात पडतो.

Web Title: He will fall sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.