निराधारांकडून खाते उघडण्यासाठी घेत होता कमिशन; एजन्टला देण्यासाठी पैसे नसल्याने स्वतःच्याच लुटीचा केला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:50 IST2025-09-18T14:49:27+5:302025-09-18T14:50:36+5:30
खोटी तक्रार पडली महागात, फिर्यादीवरच गुन्हा दाखल : ३ दिवसानंतर हरिदासने पोलिसांत विचाराअंती नोंदविली तक्रार

He was taking commission from the destitute to open accounts; he had no money to pay the agent, so he made his own loot.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : आपल्याला रस्त्यात लुटून ७३ हजार रुपयांची रक्कम पळविली, अशी तक्रार देणाऱ्या फिर्यादीचा खोटारडेपणा चौकशीनंतर स्पष्ट झाला. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या फिर्यादीवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हरिदास सखाराम पडोळे, असे या व्यक्तीचे नाव आहे. सदर प्रकरण असे, २० सप्टेंबरला हरिदास सखाराम पडोळे (६५, मांडवी ता. भंडारा) यांनी पोलिस स्टेशन करडी येथे तक्रार दिली. १७ सप्टेंबरला दुचाकीने (एमएच ३६ / ई ५४८०) सकाळी ७:४० वाजता मांडवी येथून दुधारा येथे जात असताना ढिवरवाडा जंगल परिसरात पाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी काठी फेकून दुचाकीवरून खाली पाडले व बळजबरीने पॅन्टच्या खिशातून रोख ७३ हजार रुपयांची रक्कम काढून जंगलात पळून गेले, अशी तक्रार त्याने पोलिसांत दिली. या तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहून करडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३(५) नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांनी स्वतः केला. घटनास्थळी श्वानपथकाला नेऊन तपास घेतला. एवढेच नाही तर, तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली. मात्र, शंका बळावल्याने महत्त्वाच्या साक्षीदारांना विचारपूस करून सखोल तपास केला असता वेगळाच प्रकार पुढे आला. खुद्द फिर्यादीची तक्रारच खोटी आणि पोलिसांची दिशाभूल करणारी असल्याने ठाणेदार नागलोत यांनी हरिदासविरुद्ध कलम २१७ नुसार गुन्हा दाखल केला.
असा रचला बनाव
हरिदास हा निराधार योजनेचे पात्र असलेल्या लोकांकडून कागदपत्रे घेऊन कमिशनवर त्यांचे खाते उघडण्यासाठी दुसऱ्या एजंटकडे पाठवीत होता. या कामासाठी प्रत्येक व्यक्तीकडून स्वतःसाठी ५०० रुपयांचे कमिशन घेऊन उर्वरित रक्कम समोरील एजंटला देत होता. त्याच्याकडे मांडवी येथील निराधार योजनेस पात्र लाभार्थ्यांकडून कमिशन म्हणून घेतलेले ६३ हजार रुपये जमा झाले होते. त्यातील ५९ हजार ५०० रुपये एजंटला द्यायचे होते; परंतु घटनेच्या तीन दिवसांपूर्वी त्याच्याकडील ७३ हजार रुपयांची रक्कम कुठेतरी पडून गहाळ झाली. एजंटला देण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्याने अशी कपोलकल्पीत घटना डोक्यात आखली आणि पोलिसांत खोटी तक्रारही नोंदविली. यातून त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःच त्यात फसला.
"नागरिकांनी खरी आणि वस्तूनिष्ठ माहिती द्यावी. स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये, आणि तपास भरकटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करु नये."
- गोरक्षनाथ नागलोत, ठाणेदार, करडी